वैभववाडी
वीज वितरणच्या 33 के.व्ही. लाईन बदलण्याबाबत योग्य तो तोडगा काढला जाईल. तो पर्यंत सदर मुख्य वीज वाहिनीवरून विद्युत प्रवाह सुरू केला जाणार नाही. असे लेखी आश्वासन वीज वितरणचे अधिक्षक अभियंता यांनी उंबर्डे ग्रामस्थांना दिले. भाजपा आमदार नितेश राणे यांनी वीज वितरणचे अधिकारी यांच्याशी संपर्क साधत या प्रलंबित प्रश्नाबाबत जाब विचारला. तसेच उपोषणाला बसलेल्या उंबर्डे ग्रामस्थांशी दुरध्वनी वरून संपर्क साधत चर्चा केली. आ. नितेश राणे यांच्या मध्यस्तीनंतर व अधिका-यांनी दिलेल्या लेखी आश्वासननंतर उंबर्डे वासियांनी उपोषण बुधवारी रात्री 11 वा. स्थगित केले.
2016 पासून उंबर्डे वासियांची ही मागणी आहे. परंतु अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. या लाईन बाबत अनेक अडचणी असताना लाईनच्या उद्घाटनासाठी आलेल्या खासदार राऊत यांच्यासोबत फोटो काढणा-या अधीक्षक अभियंत्यांना उपोषणस्थळी हजर करा. अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थ व सरपंच एस.एम. बोबडे यांनी व्यक्त केली होती.
जुलैमध्ये कार्यकारी अभियंता पाटील, उपअभियंता कथले, श्रीमती इंदलकर यांनी या 33 केव्ही लाईनची प्रत्यक्ष पाहणी केली होती. दरम्यान रस्त्याच्या कडेने केवळ अडीज किमी अंतर असताना पाच किमी लाईन फिरवत शेतातून नेण्याचे कारण काय? असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला होता. पाटील यांनी भूमिगत लाईन टाकण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यांचे आश्वासन हवेत विरले. त्यांनी ग्रामस्थांची शुद्ध फसवणूक केल्याचा आरोप सरपंच बोबडे यांनी केला. कोरोनात 144 लावलात तरी बेहत्तर पण उपोषण सोडणार नाही असा आक्रमक पवित्रा उंबर्डे वासीयांनी घेतला होता. वीज वितरण चे अधीक्षक अभियंता यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर रात्री अकरा वाजता उंबर्डेवासीयांनी उपोषण स्थगित केले आहे. यावेळी भाजपा मंडळ अध्यक्ष नासीर काझी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, भालचंद्र साठे, अरविंद रावराणे, युवा मोर्चा अध्यक्ष किशोर दळवी, धर्मरक्षीत जाधव, रज्जब रमदुल, उमर रमदुल, सदानंद दळवी, उदय मुद्रस, डॉक्टर खाडे, अलीबा बोथरे, दशरथ दळवी, वैभवी दळवी, जुलेखा सारंग, जायदा नाचरे, श्रावणी खाडे, शुभांगी पवार, अब्दुल नाचरे, कादीर नाचरे, खुदबू पखाली, श्रीकांत शिरसाट, तेजस पाटील, मंगेश कदम, विशाल कदम, सुनील कदम, मोहम्मदहनिफ रमदुल व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी कार्यकारी अभियंता श्री मोहिते, उपकार्यकारी अभियंता श्री सूर्यवंशी, शाखा अभियंता थोरबोले आदी उपस्थित होते.