आपत्ती व्यवस्थापन आराखडे अद्ययावत करा
तालुकास्तरीय बैठका घेवून यंत्रणा सतर्क करा
-निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे
सिंधुदुर्गनगरी
प्रांताधिकारी आणि तहसिलदारांनी मान्सूनपूर्व तयारीबाबत तालुकास्तरीय यंत्रणांची बैठक घेवून सतर्क करावे, त्याच बरोबर तालुकास्तरीय आपत्ती व्यवस्थापन आराखडे अद्ययावत करुन सादर करावेत, अशी सूचना निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केली.
मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठक आज घेण्यात आली. बैठकीला प्रांताधिकारी जगदीश कातकर, प्रशांत पानवेकर, ऐश्वर्या काळुशे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे, जिल्हा प्रशासन अधिकारी अवधूत तावडे यांच्यासह सर्व तहसिलदार व खाते प्रमुख उपस्थित होते.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत यांनी स्वागत करुन आपदा मित्रांच्याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुकटे म्हणाले, सर्व नियंत्रण कक्ष व यंत्रणांच्या संपर्क क्रमांकासह पुस्तिका बनवावी. आपत्ती काळात कोणीही मुख्यालय सोडू नये. जिल्हा परिषद तसेच नगर परिषद आरोग्य विभागाने शुध्द पाणी पुरवठा करावा. साथरोग नियंत्रणाबाबत नियोजन करावे. शालेय विभागाने शाळा सुस्थितीत ठेवाव्यात. नगर परिषद, ग्रामपंचायत यांनी नाले सफाई, धोकादायक इमारतीबाबत उपाययोजना कराव्यात. पाटबंधारे विभागाने धरणांमधील पाण्याचासाठा विसर्ग याचे नियोजन करावे.
प्रांताधिकारी श्री. कातकर यांनीही यावेळी सूचना केल्या. ते म्हणाले, पोलीस,कृषी,महसूल,सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, महावितरण यांनी आपल्याकडील साहित्य साधन-सामग्री तपासावी. नियंत्रण कक्ष सुरु करण्यासाठी नियोजन करावे. प्रांताधिकारी श्री. पानवेकर म्हणाले, नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण व्हायला हवे. तलाठी, ग्रामसेवक यांचा गावात संपर्क हवा. फोन बंद होणे, न उचलणे असे प्रकार होणार नाहीत याची दक्षता घ्यावी,सॅटेलाईट फोन वापरावयाचे प्रशिक्षण घ्या. बी.एस.एन.एल. रेल्वे, विद्यूत वितरण, उपप्रादेशिक परिवहन विभाग, बंदर विभाग आदी विभागांनाही यावेळी आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.