*चेन्नई विजयी; आरसीबी जिंकता जिंकता हरले*
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
आयपीएलच्या २४व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ८ धावांनी पराभव केला. या विजयासह महेंद्रसिंग धोनीचा संघ विजयी मार्गावर परतला आहे. गेल्या सामन्यात त्याला राजस्थान रॉयल्सकडून पराभव पत्करावा लागला होता. दुसरीकडे गेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करणाऱ्या आरसीबी संघाला यावेळी त्यांच्या घरच्या मैदानावर पराभवाला सामोरे जावे लागले.
आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसिसने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईने २० षटकांत ६ बाद २२६ धावा केल्या. प्रत्युत्तरात आरसीबीचा संघ २० षटकांत आठ गडी गमावून २१८ धावाच करू शकला. आरसीबीचा पुढील सामना २० एप्रिल रोजी मोहाली येथे पंजाब किंग्जशी होणार आहे. त्याचवेळी चेन्नई संघ २१ एप्रिल रोजी चेन्नईमध्ये सनरायझर्स हैदराबादशी भिडणार आहे.
शेवटच्या षटकात आरसीबीला विजयासाठी १९ धावांची गरज होती. सुयश प्रभुदेसाई आणि वनिंदू हसरंगा संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. प्रभुदेसाईने षटकार मारून आशा उंचावल्या पण हसरंगाच्या साथीने तो फक्त १० धावाच जोडू शकला. प्रभुदेसाईही शेवटच्या चेंडूवर बाद झाला.
पहिल्याच षटकात चेन्नईचा प्रभावशाली खेळाडू आकाश सिंगने आरसीबीला मोठा धक्का दिला. त्याने विराट कोहलीला (४) त्रिफळाचीत केले. कोहलीच्या पाठोपाठ महिपाल लोमरोर (०) ही परतला. दुसऱ्याच षटकात तो तुषार देशपांडेचा बळी ठरला.
आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसिस आणि अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल यांनी १५ धावांत दोन विकेट पडल्यानंतर झटपट धावा केल्या. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी १२६ धावांची भागीदारी केली. मॅक्सवेल ३६ चेंडूत ७६ धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत तीन चौकार आणि आठ षटकार मारले. फॅफ डुप्लेसिस ३३ चेंडूत ६२ धावा करून तंबूमध्ये परतला. त्याने पाच चौकार आणि चार षटकार मारले. डुप्लेसिस बाद झाला तेव्हा आरसीबीची धावसंख्या १४ षटकांत १५९ होती. येथून संघाला विजयासाठी सहा षटकांत ६८ धावा करायच्या होत्या.
चार विकेट पडल्यानंतर दिनेश कार्तिक आणि शाहबाज अहमद यांनी सूत्रं आपल्या हातात घेतली. कार्तिकने १४ चेंडूत २८ धावा झटपट काढल्या. त्याचवेळी शाहबाज अहमद १० चेंडूत १२ धावा करून तंबूमध्ये परतला. शेवटच्या षटकात सुयश प्रभुदेसाईने ११ चेंडूत १९ धावा केल्या, पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. चेन्नईकडून तुषार देशपांडेने तीन आणि मथिशा पाथिरानाने दोन गडी बाद केले. आकाश सिंग, महिष तेक्षाना आणि मोईन अली यांना प्रत्येकी एक बळी घेतले.
चेन्नईसाठी डेव्हॉन कॉनवे आणि शिवम दुबे यांनी स्फोटक अर्धशतके ठोकली. कॉनवेने ४५ चेंडूत ८३ तर शिवम दुबेने २७ चेंडूत ५२ धावा केल्या. अजिंक्य रहाणेने २० चेंडूत ३७ धावा केल्या. मोईन अली नऊ चेंडूत १९ धावा करून नाबाद राहिला. अंबाती रायुडूने सहा चेंडूंत १४ धावांचे आणि रवींद्र जडेजाने आठ चेंडूंत १० धावांचे योगदान दिले.
ऋतुराज गायकवाड तीन धावा करून बाद झाला. त्याचवेळी कर्णधार महेंद्रसिंग धोनी एका चेंडूवर एक धाव घेत नाबाद राहिला. आरसीबीच्या मोहम्मद सिराज, वेन पारनेल, विजयकुमार वायसाक, ग्लेन मॅक्सवेल, वनिंदू हसरंगा आणि हर्षल पटेल यांना प्रत्येकी एका फलंदाजाला बाद केले. चेन्नईने आपल्या डावात १७ षटकार ठोकले.
चेन्नईचा मोसमातील तिसरा विजय. चेन्नईचे आता पाच सामन्यांत सहा गुण झाले आहेत. त्याचवेळी आरसीबीचा हा तिसरा पराभव आहे. त्यात फक्त चार अंक आहेत. चेन्नईने गुणतालिकेत तिसरे स्थान पटकावले आहे. त्याचवेळी आरसीबी सातव्या स्थानावर आहे.
डेव्हॉन कॉनवेला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.