You are currently viewing आत्मसंरक्षणासाठी कराटे कला बहुउपयोगी -: माजी आमदार ॲड.अजित गोगटे

आत्मसंरक्षणासाठी कराटे कला बहुउपयोगी -: माजी आमदार ॲड.अजित गोगटे

कासार्डे हायस्कूल येथे दोन दिवसीय कराटे प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन

तळेरे : प्रतिनिधी

चांगले आरोग्य आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी कराटे सारख्या खेळाचा सातत्याने सराव करणे अतिशय महत्त्वाचे आहे.कोणतीही मार्शल आर्ट कला स्वतः बरोबर कुटुंबाचे ही संरक्षण करण्यासाठी निश्चितच उपयोगी पडते. युवा पिढीसाठी निरोगी मनाबरोबर,निरोगी शरीर ठेवण्यासाठी मार्शल आर्टचे प्रशिक्षण हे आज काळाची गरज असल्याचे प्रतिपादन माजी आम.अॅड.अजित गोगटे यांनी कासार्डे माध्यमिक विद्यालयात केले.
सिंधुदुर्ग जिल्हा गेन्श्युरियो कराटे डो असोसिएशन, वआयडियल ज्युदो कराटे असोसिएशन वतीने कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासार्डे येथे दोन दिवसीय कराटे प्रशिक्षण व बेल्ट परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी माजी आम. अॅड. अजित गोगटे उपस्थित प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करताना बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर कासार्डे विकास मंडळ, मुंबई या शिक्षण संस्थेच्या स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष संजय पाताडे,स्कूल कमिटी चेअरमन अरविंद कुडतरकर, संस्थापदाधिकारी तथा माजी सैनिक रवींद्र पाताडे, विद्यालयाचे प्राचार्य एम.डी. खाड्ये,इंडियन गेन्श्युरियो कराटे डो ऑफ इंडियाचे चिफ इन्स्टक्टर सेन्साई राजेश गाडे(मुंबई), शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ,सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष बयाजी बुराण,सचिव दिनेश म्हाडगुत, प्रशालेचे क्रीडा शिक्षक तथा कराटे असोसिएशनचे जिल्हा सचिव दत्तात्रय मारकड, जिल्हा पदाधिकारी तथा मुख्य प्रशिक्षक अभिजित शेट्ये, कबड्डी फेडरेशनचे जिल्हा पदाधिकारी संजय पेडणेकर,मार्टीन अल्मेडा,
दिलीप वाडकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी आमदार अजित गोगटे यांच्या शुभहस्ते हस्ते रयतेचा राजा छ.शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व श्रीफळ वाढवून या शिबिराचे उद्घाटन झाले.
उपस्थित मान्यवरांचे प्राचार्य एम.डी.खाड्ये यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

*सातत्य आणि कठोर परिश्रमामुळेच खेळाडू यशाच्या शिखरावर:* अरविंद कुडतरकर

आमच्या विद्यालयाचे द्रोणाचार्य तथा क्रीडा शिक्षक श्री. दत्तात्रय मारकड सर आणि सहकारी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विविध खेळात आमचे खेळाडू सातत्याने सराव करीत कठोर मेहनतीच्या जोरावर नेहमीच यशाच्या शिखरावर असतात.
या गुणवंत खेळाडूमूळेच विद्यालयाचा क्रीडाक्षेत्रातील नावलौकिक जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीयस्तरावरही
वाढत असल्याचे गौरवोद्गार चेअरमन अरविंद कुडतरकर यांनी याप्रसंगी काढले.

याप्रसंगी चिफ इन्स्टक्टर सेन्साई राजेश गाडे यांचा जिल्हा पदाधिकारी अभिजित शेट्ये यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड यांनी केले तर आभार अभिजित शेट्ये यांनी मानले.

 

कासार्डे: कासार्डे विद्यालयात आयोजित दोन दिवसीय कराटे प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन करताना माजी आम.अॅड. अजित गोगटे, सोबत संस्था पदाधिकारी प्राचार्य व इतर पदाधिकारी आणि कराटे प्रशिक्षक

 

प्रतिक्रिया व्यक्त करा