You are currently viewing राहुलची एकाकी झुंज व्यर्थ; पंजाब किंग्जचा लखनऊ सुपरजायंट्वर विजय

राहुलची एकाकी झुंज व्यर्थ; पंजाब किंग्जचा लखनऊ सुपरजायंट्वर विजय

*राहुलची एकाकी झुंज व्यर्थ; पंजाब किंग्जचा लखनऊ सुपरजायंट्वर विजय*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

लखनऊ येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर आयपीएल २०२३ मधील डबल हेडरच्या दुसऱ्या सामन्यात शनिवारी पंजाब किंग्जने लखनऊ सुपरजायंट्सवर दोन विकेट्स राखून विजय मिळविला. विजयासाठीचे १६० धावांचे लक्ष्य पंजाब किंग्जने १९.३ षटकांत ८ बाद १६१ धावा करीत साध्य केले. मॅथ्यू शॉर्ट (२२ चेंडूंत ३४), हरप्रीत सिंग (२२ चेंडूंत २१), सिकंदर रझा (४१ चेंडूंत ५७) यांनी विजयात मोलाचा वाटा उचलला. अखेरच्या निर्णायक षटकांमध्ये हरप्रीत ब्रार (४ चेंडूंत ६), एम्. शाहरूख खान (१० चेंडूंत नाबाद २३) आणि यांनी कसिगो रबाडा (१ चेंडूंत नाबाद ० ) यांनी विजय साकार केला. मार्क वूड, रवी बिश्नोई, युधवीर सिंग यांनी प्रत्येकी दोन विकेट्स मिळविल्या. कृणाल पंड्या, कृष्णप्पा गौतम यांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद केला.

त्याआधी, पंजाब किंग्जच्या गोलंदाजांनी प्रभावी गोलंदाजी करून लखनऊ सुपर जायंट्सला २० षटकांत ८ बाद १५९ धावांवर रोखण्यात यश मिळविले. कर्णधार के. एल. राहुलने (५६ चेंडूंत ७४) एकाकी झुंज दिल्याने लखनऊ सुपर जायंट्सला माफक धावसंख्या उभारण्यात यश आले. लखनऊ येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार के. एल. राहुल आणि काइल मेयर्स यांनी डावाची धडाक्यात सुरुवात केलेली असतानाच, आठव्या षटकातील चौथ्या चेंडूवर काइलचा (२३ चेंडूंत २९) हरप्रित ब्रारने स्वतःच्याच गोलंदाजीवर झेल टिपत त्याला बाद केले. त्यानंतर विशिष्ट अंतराने लखनऊचे फलंदाज बाद होत राहिले. राहुलनंतर कृणाल पंड्या (१७ चेंडूंत १८) आणि मार्कस स्टोइनिस (११ चेंडूंत १५) यांनाच दुहेरी धावसंख्या गाठण्यात यश आले. दीपक हुडा (३ चेंडूंत २), कृष्णप्पा गौतम (२ चेंडूंत १) यांनी निराशा केली. निकोलस पुरन आणि युधवीर सिंग हे भोपळाही न फोडता परतले. आयुष बदोनी (६ चेंडूंत नाबाद ५) आणि रवी बिश्नोई (१ चेंडूंत नाबाद ३) यांना धावसंख्या वाढविण्यासाठी मोठे फटके लगावण्यात अपयश आले. सलामीला आलेला राहुल एकाकी झुंज देत एकोणिसाव्या षटकातील चौथ्या चेंडूवर बाद झाला. अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीवर उडालेला त्याचा झेल बदली खेळाडू एन. टी. एलिसने टिपला. ५६ चेंडूंत ७४ धावा करताना राहुलने एक षटकार आणि ८ चौकार लगावले. शिखर धवनच्या अनुपस्थितीत पंजाब किंग्जचे नेतृत्व करणाऱ्या सॅम करनने ३१ धावांच्या मोबदल्यात तीन विकेट्स मिळविल्या. कासिगो रबाडाने ३४ धावांच्या मोबदल्यात दोन विकेट्स घेतल्या. अर्शदीप सिंग, हरप्रीत बार, सिकंदर रझा यांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद केला.

सिकंदर रझाला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा