You are currently viewing इचलकरंजीत कचरा वेचक महिलांचा मेळावा

इचलकरंजीत कचरा वेचक महिलांचा मेळावा

 

इचलकरंजी

काबाडकष्ट करुन आणि जीवाची पर्वा न करता कुटुंबासाठी झटणार्‍या कचरा वेचक महिलांच्या जीवनात स्थिरता मिळावी यासाठी शासनाकडून विविध योजनांच्या माध्यमातून लाभ मिळवून देऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू. त्याचबरोबर आपल्या न्याय हक्कासाठी या महिलांनी एकजुट होऊन प्रसंगी संघर्षाची तयारी ठेवावी. या महिलांना त्यांचे हक्काचे घरकुलासह आवश्यक ते सर्व लाभ आपण निश्‍चितपणे मिळवून देऊ, असे प्रतिपादन आमदार प्रकाश आवाडे यांनी केले.
ताराराणी पक्ष आणि नवक्रांती महिला कामगार विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कचरा वेचक महिलांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना आमदार आवाडे बोलत होते. याचवेळी घरेलु महिला कामगारांना शासनाकडून मिळालेल्या प्रत्येकी 10 हजार रुपये सन्मानधनाची पत्रे प्रदान करण्यात आली. कचरा वेचक महिलांचा मेळावा संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्यांदाच इचलकरंजी येथे पार पडला.
आमदार आवाडे यांनी, शहरातील कचरा गोळा करण्याचे काम करुन या महिला स्वच्छता कामात योगदान देत आहेत. पहाटेपासूनच या महिला कचरा, भंगार गोळा करण्यासाठी निघतात. सतत कचर्‍यातच वावरावे लागत असल्यामुळे त्यांना अनेक आजारांचा सामना करावा लागतो. भंगार गोळा करून ते विकायचे आणि जे चार पैसे हातात पडतील त्यातून उदरनिर्वाह करायचा असे त्यांचे जीवनमान आहे. आपण जे सोसले, जे कष्ट केले ते आपल्या मुलांच्या जीवनात येऊ नयेत यासाठी त्या प्रयत्न करत आहेत. त्यांचे आरोग्याविषयक अनेक प्रश्‍न आहेत. त्यांच्यासाठी सरकाने लाभदायक योजना राबवावी यासाठी आपण प्रयत्न करु अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. बहुमजली इमारतीच्या माध्यमातून हक्काचे घरकुल आपण मिळवून देऊ. त्यासाठी सर्वांनी संघटीत होऊन घरकुल संदर्भातील प्रस्ताव तयार करुन द्यावा. घरकुलांसाठी आवश्यक तो निधी आपण शासनाकडून मंजूर करुन आणू. त्याचबरोबर आरोग्य विमा, अपघात विमा, पाल्यांचे शिक्षण आदी सर्वच प्रश्‍न आपण नजीकच्या काळात मार्गी लावू. घरेलु महिला कामगारांप्रमाणे या महिलांना लाभ मिळवून देण्यासाठी आपण निश्‍चितपणे प्रयत्न करु, अशी ग्वाहीही आमदार आवाडे यांनी यावेळी दिली. या कचरा वेचक महिलांसाठी त्यांच्याकडून गोळा केला जाणार्‍या प्लॅस्टिकवर प्रक्रिया करणारा एखादा प्रोजेक्ट अथवा त्यांना स्वत:चा व्यवसाय सुरु करण्यासाठीही आपण सर्वतोपरी सहकार्य करु, असेही ते म्हणाले.
स्वागत ताराराणी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे यांनी केले. प्रास्ताविकात नवक्रांती महिला कामगार विकास संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती मंगल सुर्वे यांनी कचरा वेचक महिलांना भेडसावणार्‍या विविध समस्या आणि अडचणींची विस्तृत माहिती दिली. तसेच नवक्रांती संस्थेच्या माध्यमातून या महिलांचे केले जात असलेले संघटन याचीही माहिती सांगत सर्वांनी नोंदणी करण्याचे आवाहन केले. यावेळी अहमद मुजावर व चंद्रकांत पडियार यांनी आपल्या मनोगतात कचरा वेचक महिलांच्या व्यथा, त्यांच्या समस्या आणि त्यांच्यासाठी काय हवे या संदर्भात सविस्तर ऊहापोह केला.
याप्रसंगी डॉ. राहुल आवाडे, सौ. सुवर्णा लाड, रंगराव लाखे, कोंडीबा दवडते, अनिल शिकलगार, नौशाद जावळे, बाळासाहेब कलागते, प्रा. शेखर शहा, अरुण आवळे, राहुल घाट, राजाराम बोंगार्डे, दीपक कांबळे, फरीद मुजावर, इरफान आत्तार, विजय पोवळे, शमा सलाती, तुळसाबाई काटकर, मंगल पवार आदींसह शहर व परिसरातील कचरा वेचक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आभार रमेश पाटील यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा