You are currently viewing सिंधुदुर्गात विमानसेवेचे आता रडगाणे सुरू

सिंधुदुर्गात विमानसेवेचे आता रडगाणे सुरू

अनियमित असणारी विमान सेवा सुधारावी अन्यथा पूर्णतः बंद करावी; उद्योजक डॉ. दीपक परब यांची मागणी

मालवण :

 

तीन वर्षांपूर्वी मुंबईहून सिंधुदुर्गसाठी उत्साहात सुरू झालेल्या विमानसेवेचे आता रडगाणे सुरू झाले आहे. कधी विमान रद्द, तर कधी खूप मोठा विलंब याचा सामना प्रवाशांना करावा लागत आहे. ११ एप्रिल रोजी सुद्धा मुंबई वरून सिंधुदुर्ग मध्ये येणारे विमान अकस्मात रद्द केल्याने याचा फटका महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ऍग्रीकलचरचे को चेअरमन, उद्योजक श्रीकृष्ण उर्फ दीपक परब याना बसला. विमान रद्द झाल्याची कोणतीही सूचना प्रवासापूर्वी वेळेत दिली जात नाही ही सुद्धा बाब संतापजनक अशीच आहे. एखादा रुग्ण सिंधुदुर्ग मधून मुंबई येथे जात असल्यास विमान रद्द झाल्यास प्रसंगी जीवावर सुद्धा बेतणार आहे. सुरू होणारा पर्यटन हंगाम पाहता सदर अनियमित असणारी विमान सेवा सुधारावी अन्यथा पूर्णतः बंद करावी अशी मागणी उद्योजक डॉ दीपक परब यांनी केली आहे.

मागील दहा दिवसांत या सेवेला दोन्ही बाजूंनी निम्म्याहून अधिक वेळा विलंब झाला आहे. कोकणला हवाईमार्गे जोडण्यासाठी नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने ‘उडान’ योजनेंतर्गत मुंबई- सिंधुदुर्ग अशी वाहतूक चालू केली आहे. ही सेवा ‘उडान’ अंतर्गत असल्याने धोरणानुसार त्याचे दर १,८०० ते २,२०० रुपयांच्या नियंत्रणात राहणे अपेक्षित होते. पण, या सेवेसाठी प्रवाशांना किमान २,८५५ तर अनेकदा १० हजार ते १२ हजार रुपये मोजावे लागत असल्याचे चित्र आहे. या विमान सेवेमध्ये प्रवाशांना अनेकदा समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

हे विमान मुंबईहून सकाळी ११.४० वाजता सुटते व त्याच दिवशी परत येते. सिंधुदुर्गचे चिपी विमानतळ शहरापासून बाहेर आहे. या स्थितीत मागील आठवड्यात दुपारी सुटणारे हे विमान दाखल झाल्यावर एक तासाने रद्द झाल्याचे कळविण्यात आले. त्यामुळे परत मुक्कामाच्या ठिकाणी जाताना तारेवरची कसरत करावी लागली. मुंबईहून सुटताना विमानाचा विलंब ठरलेला असतो. एकूणच विस्कळीत अशी ही विमानसेवा आहे.

‘ग्लोबल कोकण’ चे संस्थापक संजय यादवराव यांनी देखील या विमानसेवेबाबत गांभीर्याने विचार करावा असे सुचवले आहे. विमान तिकीट साठी जास्तीची रक्कम मोजण्याची तयारी जिल्हावासीयांची आहे. कारण अत्यावश्यक वेळी जिल्ह्यात येण्यासाठी विमानसेवा महत्वाची ठरत आहे. परंतु पैसे मोजून सुद्धा नियमित वेळेत सेवा मिळत नसल्याने विमानसेवा मृगजळच ठरत आहे. दरम्यान सदर विमानसेवा वेळेत व नियमित होण्यासाठी केंद्रीय हवाई मंत्रालयाने प्राधान्याने उपाय योजना कराव्यात अशी मागणी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ऍग्रीकलचरचे को चेअरमन, उद्योजक श्रीकृष्ण उर्फ दीपक परब यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा