*गुजरात टायटन्सने पंजाब किंग्जचा सहा गडी राखून केला पराभव*
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
पंजाब किंग्जला हरवून गुजरात टायटन्सने आयपीएल २०२३ च्या १८ व्या सामन्यामध्ये तिसरा विजय नोंदवला आहे. या विजयासह गुजरात संघ सहा गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. या सामन्यात पंजाब किंग्जने प्रथम फलंदाजी करताना १५३ धावा केल्या आणि गुजरातने चार गडी गमावून एक चेंडू राखून लक्ष्य गाठले. गेल्या सामन्यात गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्या खेळला नाही आणि विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या त्याच्या संघाने सामना गमावला. मात्र, या सामन्यात त्याचे पुनरागमन होताच गुजरात संघ विजयी मार्गावर परतला.
प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जने आठ गडी गमावून १५३ धावा केल्या. पंजाबकडून मॅथ्यू शॉर्टने सर्वाधिक ३६ धावा केल्या. त्याचवेळी गुजरातकडून मोहित शर्माने दोन बळी घेतले. गुजरात संघाने १९.५ षटकात चार विकेट गमावत १५४ धावा करत सामना जिंकला. गुजरात टायटन्सच्या विजयात ६७ धावा करणाऱ्या शुभमन गिलचा सर्वात मोठा वाटा होता. पंजाबमध्ये जन्मलेला आणि या राज्यासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळणारा गिल पंजाब किंग्जच्या पराभवाचे कारण ठरला.
हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून पंजाबला फलंदाजीसाठी पाचारण केले. पहिल्याच षटकात मोहम्मद शमीने प्रभसिमरन सिंगला शून्यावर तंबूमध्ये पाठवले. हैदराबादविरुद्धच्या गेल्या सामन्यात नाबाद ९९ धावांची खेळी करणारा कर्णधार शिखर धवन आज चालला नाही. त्याला जोशुआ लिटलने आठ धावांवर बाद केले. ऑस्ट्रेलियन बिग बॅश लीगमध्ये धमाकेदार खेळ करणाऱ्या मॅथ्यू शॉर्टने पॉवरप्लेमध्ये सहा चौकार आणि एक षटकार ठोकला, ज्यामुळे पंजाबने सहा षटकांत ५२ धावा केल्या, मात्र राशिद खानने सातव्या षटकात ३६ धावांवर त्याला त्रिफळाचीत केले.
तीन विकेट पडल्यानंतर धावांचा वेग निश्चितच मंदावला, पण जितेश शर्माने भानुका राजपक्षेसोबत ३७ धावांची भागीदारी केली. येथे मोहित शर्माने २५ धावांवर जितेशला बाद केले. २६ चेंडूत अत्यंत संथ २० धावा करून राजपक्षेही बाद झाला. सॅम कुरन आणि शाहरुख खान यांनी शेवटपर्यंत खेळत पंजाबला १५३ पर्यंत नेले. शाहरुख खान नऊ चेंडूत २२ धावा करून धावबाद झाला. त्याचवेळी मोहितने सॅम करणला बाद केले.
मोहित शर्मा २०२० नंतर प्रथमच आयपीएलमध्ये सामना खेळला आहे. तो पहिल्यांदाच गुजरात टायटन्सकडून खेळत होता. त्याने चार षटकात अवघ्या १८ धावा देत दोन बळी घेतले. त्याच्याशिवाय गुजरातच्या सर्व गोलंदाजांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
१५४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वृद्धीमान साहा आणि शुभमन गिल या जोडीने गुजरातला धडाकेबाज सुरुवात करून दिली. गिलने एक टोक सांभाळले आणि साहाने झटपट धावा केल्या. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ४८ धावा जोडल्या. कागिसो रबाडाने साहाला मॅथ्यू शॉर्टकडे झेलबाद करून आयपीएलमधील १०० बळी पूर्ण केले. साहा १९ चेंडूत ३० धावा काढून बाद झाला, पण त्याच्या खेळीमुळे गुजरातला पॉवरप्लेमध्ये ५६ धावा करता आल्या.
शुभमन गिलने साई सुदर्शनसोबत दुसऱ्या विकेटसाठी ४१ धावांची भागीदारी करून डाव पुढे नेला. दोघांनी संथ फलंदाजी केली, पण विकेट्स राखल्या आणि धावगती फारशी कमी होऊ दिली नाही. २० चेंडूत १९ धावा करून साई सुदर्शन अर्शदीप सिंगचा बळी ठरला. यानंतर कर्णधार हार्दिक पंड्याही ११ चेंडूत आठ धावा करून बाद झाला.
शेवटी शुभमन गिल आणि डेव्हिड मिलरने गुजरातला विजयाच्या उंबरठ्यावर नेले, पण शेवटच्या षटकात सॅम करनने शुभमन गिलला त्रिफळाचीत करून सामन्यात उत्साह आणला. गिल ४९ चेंडूंत सात चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ६७ धावा करून बाद झाला. अखेर राहुल तेवतियाने चौकार मारून गुजरातला एक चेंडू राखून विजय मिळवून दिला. पंजाबकडून अर्शदीप सिंग, कागिसो रबाडा, हरप्रीत ब्रार आणि सॅम करन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
मोहित शर्माला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.