You are currently viewing निसर्गवेड्या मित्राची अकाली एक्झिट…

निसर्गवेड्या मित्राची अकाली एक्झिट…

कालचा दिवसही उजाडला तो सुध्दा वेदनामय. गेल्या तीन महिन्यात प्रामाणिकपणे निकोप समाजाच्या जडणघडणीसाठी झटणारे अनेक हात आमचा कायमचा हात सोडून जात आहे. ही महाभयंकर जीवघेणी मालिका थांबण्याचे नांव घेत नाही.
आमचे मित्र संजय देसाई, फक्त पर्यावरणप्रेमी,  या पलिकडची या मला आवडलेल्या मनस्वी माणसाची ओळख करायची झाली तर “एक प्रेमळ, संवेदनशील माणूस”. तशी त्यांची माझी ओळख पहिल्यापासून होती… पण कळणे मायनींग आंदोलनात ती मैत्री आणखीन घट्ट झाली. मी त्या आंदोलनाच्या वेळी अनेकवेळा त्या भागात फिरलो. अनेकदा संजय आमच्या बरोबर असायचे. एखाद्या गावातील मिंटीगमध्ये माझी ते ओळख करून देताना म्हणायचे..”हे नकुल पार्सेकर, आमचे समविचारी मित्र”..
कळणे मायनींगच्या लढ्यात काही लबाड आणि स्वार्थी माणसं भेटली पण त्याच दुःख वाटल नाही, कारण संजय सारखी तत्वासाठी लढणारी काही निस्वार्थी माणसही होती. ज्यात संजयचं नाव अग्रक्रमाने घ्यायला पाहिजे.
मायनींगच्या लढ्यातील पर्यावरणप्रेमी म्हणून लढणारा मी एक छोटासा बिंदू होतो. मात्र सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या सुंदर गावांच आणि स्वर्गाहून सुंदर अशा निसर्गाच जतन, संवर्धन आणि संरक्षण करण्याच काम करणारे असे मोजकेच “संजय होते”
मला आठवत, इकोसेन्सीटीव या संवेदनशील विषयाचा प्रत्यक्ष सखोल अभ्यास करण्यासाठी या देशातील जेष्ठ व श्रेष्ठ पर्यावरणतज्ञ डाँ. माधवराव गाडगीळ यांची टीम पुण्याहून येणार असल्याची बातमी जेव्हा वर्तमानपत्रात प्रकाशित झाली तेव्हा मला पहिला फोन संजय यांचा आला. त्यांना गाडगीळ सरांची भेट हवी होती. पश्चिम घाटातील जैवविविधते बाबत त्यांना निवेदन द्यायचं होत. योगायोगाने त्या गाडगीळ सरांच्या चारही दिवसाच्या दौऱ्याच्या नियोजनात व सोबत मी, स्व.प्रा.गोपाळराव दुखंडे सर, सौ.वैशाली पाटील, पत्रकार शेखर सामंत वगैरे मंडळी होतो. संजयला गाडगीळ सरांची भेट मिळाली. तेव्हा त्यांनी इकोसेन्सीटीव याबाबत दिलेलं चार पानी निवेदन एवढं प्रभावी होतं.. त्यावर नुसती नजर टाकून गाडगीळ सर म्हणाले.. आपण इथले भूमीपुत्र आणि शेतकरी आहात का? त्याशिवाय एवढी वास्तव आणि जमीनीवरची माहिती देवूच शकत नाही… असं म्हणून ते निवेदन स्विकारल.
अनेकजण प्राण्यांवर, पशुपक्षांवर प्रेम करतात. संजय यांचे सगळ्यांच “जैवविविधतेवर”, अपार प्रेम. हुमला ( एक मोठी मुंगी ) या हुमल्याचे वनस्पतीना होणारे सकारात्मक उपयोग यावर त्यांची डाँक्टरेटच होती. एकदा तर एका पक्षीमित्र कार्यक्रमात त्यांनी या “हुमल्यावर.”मला अर्धा तास लेक्चर दिलं.
ते जसे निसर्गप्रेमी होते तसेच ते विकसनशील व अभ्यासू शेतकरी होते. पोलीस खात्यातून सेवानिवृत्त घेतल्यावर त्यांनी फळबागायतदार संघ, शेतकरी स्थापन करून शेती क्षेत्रात आधुनिक बदल आणि परंपरागत शेती याची योग्य सांगड घालून जास्त उत्पादन कसे काढावे?  याचे ते मार्गदर्शन करत. रहाणी अतिशय साधी. काबाडकष्ट करण्याची तयारी आणि अन्यायाविरुद्ध भिडण्याचा स्वभाव मी जवळून अनुभवलाय.
कळणे मायनींगच्या आंदोलनात काही जणावर गंभीर आरोप ठेवण्यात आले होते. ( माझ्या माहिती प्रमाणे सर्वजण निर्दोष सुटले). त्याना मानसिक आधार देण्यासाठी आम्ही भेटत असू. एकदा एका रात्री मी आणि माजी आमदार प्रमोद जठार त्या कथित आरोपीपैकी एका आरोपीच्या वयस्कर आईवडीलांना भेटायला गेलो होतो. तेव्हा त्या ठिकाणी संजय होते. तेव्हा संजय यांची संवेदनशीलता मी अनुभवली. संजय म्हणाले.”हे दोघे वयस्कर इथ घरात पडून आहेत. मुलगा कथित आरोपाखाली जेलमध्ये यांच्या पोटापाण्याचं काय “? संजय हे पोटतिडकीने बोलत होते… त्यावेळी मा.जठार यांनी तिथल्या तिथे त्या कुटुंबियांना आर्थिक मदत करून दिलासा दिला..
दुसऱ्या दिवशी संजय यांचा मला फोन आला, जठाराना सांगा…आमचे आभार. इ.इ.
संजयने आपल्या मुलींना प्रथा, परंपरा याविरुद्ध जीवन आणि आयुष्य कसे जगता येईल याचे शिक्षण दिलं. कारण आजकाल पुस्तकी ज्ञानापेक्षा व्यवहारिक ज्ञान असणे आवश्यक आहे..याचा अनुभव मी त्यांची मुलगी नम्रता हिच्याकडून घेतला. जी गोव्यात एक रोखठोक पत्रकार म्हणून काम करत आहे. सोशल मिडियाच्या माध्यमातून तीचा आणि माझा सुसंवाद आणि काही विषयावर विसंवादही सुरू असतो. पण ती आपल्या मतावर कायम ठाम असते. एकदा ती माझ्या अटलच्या कार्यालयात आली होती. ती तेव्हा माझ्याशी स्त्रियांच्या आत्मसन्मानाबाबत बोलत होती. तेव्हा तिला माहीत नव्हत की मी आणि तिचे बाबा मित्र आहोत.. मला म्हणाली. “तुम्ही, बाबांना ओळखता? मी म्हटलं होय… ते हुमल्याचे डाँक्टर.. यावर ती खदखदून हसली…पण आज तिच्या आणि एकंदरीत सर्वच देसाई परिवाराच्या या हसण्याला या क्रुर नियतीने ब्रेक दिला.
संजयच्या आठवणी खूप आहेत. खूप दिवस भेटही झाली नाही… आणि आता ती कधीच होणारही नाही. हे भीषण वास्तव माझं मन स्विकारायला तयार नाही…
नियतीने माझ्या एका निसर्गवेड्या मित्राची आमच्यापासून, निसर्गापासून, पशूपंक्षापासूनं, सगळ्या जैवविविधतेपासून आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्यावर अपार प्रेम करणाऱ्या कुटुंबियापासून कायमची ताटातूट केली…
भावपूर्ण आदरांजली… ओमशांती..

… अँड.नकुल पार्सेकर…

प्रतिक्रिया व्यक्त करा