*आरसीबीला २१३ धावाही पडल्या कमी; लखनौने सामना एक विकेट राखून जिंकला*
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
आयपीएल २०२३ मध्ये सोमवारी (१० एप्रिल) या हंगामातील सर्वात रोमांचक सामना पाहायला मिळाला. या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा एका विकेटने पराभव केला. आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना २ बाद २१२ धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनौने नऊ गडी गमावून २१३ धावा केल्या आणि अखेरच्या चेंडूवर सामना जिंकला. या विजयासह लखनौचे चार सामन्यांतून सहा गुण झाले असून हा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर आला आहे.
या सामन्यात आरसीबीकडून विराट कोहलीने ४४ चेंडूत ६१, ग्लेन मॅक्सवेलने २९ चेंडूत ५९ आणि कर्णधार फाफ डुप्लेसिसने ४६ चेंडूत नाबाद ७९ धावा केल्या. त्याचवेळी लखनौकडून मार्कस स्टॉइनिसने ३० चेंडूत ६५ आणि निकोलस पूरनने १९ चेंडूत ६२ धावा केल्या.
कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्यातील दुसर्या विकेटसाठी ५० चेंडूत ११५ धावांच्या भागीदारीमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने लखनौ सुपरजायंट्सविरुद्ध दोन बाद २१२ धावा केल्या. यापूर्वी विराट कोहलीने ४४ चेंडूत ६१ धावांची खेळी केली होती. त्याने फॅफसोबत पहिल्या विकेटसाठी ९६ धावांची भागीदारी केली. मॅक्सवेलने २९ चेंडूंत सहा षटकार आणि तीन चौकारांच्या मदतीने ५९ धावा केल्या, तर फाफने ४६ चेंडूंत पाच चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने नाबाद ७९ धावा केल्या.
लखनऊचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकल्यानंतर आरसीबीला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस यांनी राहुलच्या निर्णयाचे स्वागत केले. विराटने दुसऱ्याच षटकातच आवेश खानला चौकार आणि षटकार ठोकले. यानंतर विराटने मार्क वुडच्या गोलंदाजीवर एक षटकार आणि एक चौकार लगावला. पॉवरप्लेमध्ये विराटने राज्य केले. आयपीएलच्या इतिहासातील पॉवरप्लेमध्ये त्याने सर्वाधिक ४२ धावा केल्या. यापूर्वी त्याने २०१८ मध्ये राजस्थानविरुद्ध पॉवरप्लेमध्ये ३६ धावा केल्या होत्या. मात्र, पॉवरप्लेमध्ये आरसीबीला केवळ ५६ धावाच करता आल्या.
विराटने ३५ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र, अमित मिश्रा आक्रमणावर येताच मिडविकेटच्या सीमारेषेवर स्टोइनिसकडे झेलबाद झाला. विराटने ४४ चेंडूत चार चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ६१ धावा केल्या. त्याने फाफसोबत ६९ चेंडूत ९६ धावांची भागीदारी केली. ग्लेन मॅक्सवेलने अमित मिश्राला एक चौकार आणि एक षटकार ठोकला. बिश्नोईच्या पुढच्या षटकात फाफने लागोपाठ दोन षटकार ठोकले. यामध्ये ११५ मीटर लांब मारलेला षटकार क्रीडांगणाच्या बाहेर गेला. त्याच षटकात मॅक्सवेलनेही षटकार ठोकला. फाफने ३५ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. दोघांनी या काळात अर्धशतकी भागीदारीही पूर्ण केली.
आरसीबीची धावसंख्या १५ षटकांत १ बाद १३७ धावांवर होती. इथून फाफ आणि मॅक्सवेलने गोलंदाजांवर तुटून पडले. उनाडकटने टाकलेल्या १८व्या षटकात २३ धावा काढल्या, ज्यामध्ये फाफने एक चौकार आणि दोन षटकार मारले. पुढच्याच षटकात लागोपाठ दोन षटकार मारून मॅक्सवेलने आयपीएलमधील आपले १४वे अर्धशतक पूर्ण केले. त्याने अवघ्या २४ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. या षटकात २० धावा आल्या आणि आरसीबीने २०० चा टप्पा पार केला. दोघांनी ४४ चेंडूत शतकी भागीदारी पूर्ण केली. आरसीबीने शेवटच्या पाच षटकात ७५ धावा काढल्या.
२१३ च्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना लखनौची सुरुवात अत्यंत खराब झाली. पहिली विकेट एका धावेवर तर दुसरी विकेट २३ धावांवर पडली. काइल मेयर्स खाते न उघडताच बाद झाला. त्याचवेळी दीपक हुडा नऊ धावा करून बाद झाला. २३ धावांवर लखनौची तिसरी विकेट पडली. कृणाल पांड्यालाही खाते उघडता आले नाही. लखनौचा संघ चार षटकांत २३ धावांत तीन गडी गमावून संघर्ष करत होता.
चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मार्कस स्टॉइनिसने लोकेश राहुलसह डाव सांभाळला. त्याने ३० चेंडूत ६५ धावा केल्या आणि ११ व्या षटकात बाद होण्यापूर्वी लखनौची धावसंख्या ९९ धावांवर नेली. पुरनने दुसऱ्या चेंडूवरच षटकार ठोकून संघाची धावसंख्या १०० धावांपर्यंत नेली, पण पुढच्याच चेंडूवर राहुल बाद झाला. त्याने २० चेंडूत १८ धावा केल्या.
राहुल बाद झाल्यानंतर निकोलस पूरनने तुफानी फलंदाजी केली. त्याने अवघ्या १५ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. या मोसमातील हे सर्वात वेगवान अर्धशतक ठरले. पुरणने १९ चेंडूत ६२ धावांची खेळी केली. तो १७व्या षटकात बाद झाला. तोपर्यंत संघाची धावसंख्या १८९ धावांपर्यंत पोहोचली होती. यानंतर आयुष बडोनी आणि जयदेव उनाडकट यांनी सामना पुढे नेला, पण षटकार मारण्याच्या प्रयत्नात बडोनीचीही विकेट पडली. त्याने २४ चेंडूत ३० धावा केल्या.
शेवटी जयदेव उनाडकटने संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले, पण सात चेंडूत नऊ धावा केल्यानंतर तोही अखेरच्या षटकात बाद झाला. आवेश खानने शेवटच्या चेंडूवर अवांतर धाव घेत संघाला विजय मिळवून दिला. आरसीबीकडून सिराज आणि वेन पारनेलने प्रत्येकी तीन बळी घेतले. हर्षल पटेलला दोन आणि कर्ण शर्माला एक विकेट मिळाली.
निकोलस पूरनला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
*संवाद मिडिया*
*गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आपल्या हक्काचे घर बुक करा*
*🏬 देवगिरी हाइट्स 🏬*
*आठ मजली भव्य प्रकल्प…*
*1 BHK & 2 BHK फ्लॅट्स*
*🏤”दर्पण कन्स्ट्रक्शन”*
*🏚️सावंतवाडी🌳*
*घेऊन आले आहेत…! अगदी 🏞️नरेंद्र डोंगराच्या🌳 कुशीत…! प्रसिद्ध माठेवाडा🛕 परिसरात*
*🏬 देवगिरी हाइट्स 🏬*
*आठ मजली भव्य प्रकल्प…*
*📲 अधिक माहितीसाठी संपर्क साधा :-*👇
*9890968845 / +918379896943*
*🏠ऑफिस :- 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग*
*🌐Advt Web link*
———————————————