परशुराम उपरकर यांची माहिती; कारवार येथे गाबीत बांधवांची बैठक
कणकवली :
अखिल भारतीय गाबीत समाज,अध्यक्ष माजी आमदार श्री.परशुराम उपरकर,उपाध्यक्ष ऍड.काशिनाथ तारी,गाबीत समाज,सिंधुदुर्ग अध्यक्ष श्री.चंद्रशेखर उपरकर यांनी कर्नाटक राज्यातील कारवार येथील उत्तर कन्नड जिल्हा हिंदू, गाबीत समाज संस्थेस(नंदनगड्डा,कारवार) भेट देऊन सिंधुदुर्ग मालवण येथील दांडी किनारी होणाऱ्या “गाबीत महोत्सवाची” माहिती देऊन सर्व गाबीत बांधवांना 27 एप्रिल ते 30 एप्रिल 23 पर्यंत उपस्थित रहाण्यासाठी आग्रहाचे निमंत्रण दिले आहे. यावेळी उत्तर कन्नड जिल्हा हिंदू गाबीत समाज संस्थेचे अध्यक्ष श्री.राम जोशी, कार्यदर्शी श्री.आनंद जामसदडेकर, उपाध्यक्ष श्री.विनोद सागेकर, प्रेमानंद सावंत, विनायक सागेकर, गणपति टिकम, सुनिल कुमठेकर वगैरे पदाधिकारी उपस्थित होते.
नंदनगड्डा, कारवार येथे संस्थेचे श्री.सिद्धिविनायक गणपति मंदिर असून बाजूला लग्नाचा हॉल उपलब्ध आहे. बहुसंख्य गाबित बंधूंची मूळ कुलदैवते हि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण, देवगड, वेंगुर्ला येथील किनारपट्टी गावातील आहेत. इथे सुमारे 182 किलोमिटर समुद्री किनारपट्टी असून जास्तीत जास्त जागा हि केंद्र शासनाच्या संरक्षित वन क्षेत्रात असल्याने विकास करताना स्थानिक ग्रामस्थांना अडचणी येतात.
कारवार शिवाय गोवा हद्दीला लागून बेतुल, काणकोण, कुमठा वगैरे भागात गाबीत वस्ती असून ती सुमारे 25 हजार पर्यंत असावी असा अंदाज आहे. भविष्यात या सर्वाँना आणि गोवा राज्यातील गाबीत बांधवांना अखिल भारतीय गाबीत समाज महासंघाच्या झेंड्याखाली एकत्र आणण्याचा मनोदय अखिल भारतीय गाबीत समाज महासंघाचे अध्यक्ष माजी आमदार परशुराम उपरकर यांनी यावेळी व्यक्त केला आहे.