सिंधुदुर्गातील डि एड बेरोजगारांचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना भेटणार – केंद्रीय मंत्री नारायण राणे
सिंधूनगरी
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून डीएड बेरोजगारांना न्याय देऊ पण तोपर्यंत उपोषण मागे घ्या. माझ्या जिल्ह्यातील सुशिक्षित तरुण-तरुणी रस्त्यावर बसले तर मला दुःख होईल. मला थोडा वेळ द्या, जो प्रश्न मी हाती घेतो तो नक्कीच सोडवितो अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सिंधुनगरी येथील डीएड बेरोजगाराच्या उपोषण स्थळी दिली. आपला देव आला आहे त्यामुळे आपला प्रश्न नक्कीच सुटेल अशी प्रतिक्रिया डीएड बेरोजगारांनी व्यक्त करत चौदाव्या दिवशी हे उपोषण आंदोलनकर्त्यांनी मागे घेतले. यावेळी उपोषणकर्त्यांचा कंठ दाटून आला होता.
शिकलेल्या डीएड बेरोजगारांच्या भावनेचा आणि त्यांच्या नोकरीच्या प्रश्नाचा निर्माण झालेल्या गुंता गंभीर असून याची जाणीव मला आहे. सरकारने डीएड बेरोजगारांच्या नोकरी बाबत बदललेली भूमिका व सरकारचे नवनवीन नियम त्रासदायक ठरत असतील तर ते बदलून घेण्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करु. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येत्या मंगळवारी भेट घेऊन हा प्रश्न त्यांच्यासमोर मांडेन. ज्या उमेदवारांनी डीएड पदविका पूर्ण केली आहे त्यांचा पहिला प्रश्न सोडवावा यासाठी जुन्या पद्धतीप्रमाणे शिक्षण सेवक भरती करावी व त्यानंतर मग नवीन पद्धत सुरू करावी असा प्रयत्नही मी करणार आहे. अशी ग्वाही नारायण राणे यांनी दिली.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून आपला हा प्रश्न लवकरात लवकर सोडविला जाईल या आश्वासनानंतर गेले 14 दिवस सुरू असलेले जिल्हाधिकारी कार्यालय समोरील डीएड बेरोजगार संघटनेचे आंदोलन तूर्तास मागे घेतले आहे.
होणाऱ्या आगामी शिक्षक भरती मध्ये जिल्ह्यातील स्थानिक डीएड बेरोजगारांना संधी दिली जावी, भरतीमध्ये सर्व स्थानिक उमेदवारांना संधी दिली जावी, वयोमर्यादेचं बंधन असू नये आदि मागण्यासाठी गेल्या 14 दिवसांपासून सिंधुदुर्ग नगरीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डीएड बेरोजगार उमेदवारांचे आंदोलन सुरू होतं. या आंदोलनाला शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी भेट दिली होती. त्याचबरोबर जिल्ह्यातील अनेक लोकप्रतिनिधींनी भेट दिली होती. मात्र तरीही हे आंदोलन डीएड बेरोजगार संघटनेने मागे घेतले नव्हते. मात्र रविवारी सायंकाळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी या आंदोलन स्थळी जात आंदोलनकर्त्या सर्व डीएड बेरोजगार उमेदवारांशी चर्चा केली आणि हा प्रश्न सोडण्यासाठी आपल्याला वेळ द्या अशी विनंती केली. आपण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून यावर तोडगा काढू आणि जिल्ह्यातील जेवढे उमेदवार आहेत त्या सर्वांची भरती करण्यासाठी सरकारला भाग पाडू असे आश्वासन दिले. यानंतर डीएड बेरोजगारांनी 14 दिवस सुरू असलेले आंदोलन नारायण राणे यांच्या हस्ते ज्यूस घेऊन आंदोलन थांबविण्यात आले.