*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा.सदस्य लेखक कवी मुबारक उमरानी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*सौदा*
सौदा झालेल्या शेतात
चिंच एकटी रडते
दु:ख मातीचे घेऊनी
नव्या लोकाशी लढते
हाती घेऊन कु-हाडी
चिंचे भोवती फेरतो
घाव सोसत मनात
चिंच मनात झुरते
बांधावरची बाभळ
मला बघून रडते
जाई जुई नि शेवंता
गर्द दु:खात पडते
पक्षी करीत कल्लोळ
रानभर उडतात
घेर धरून माझ्याशी
भरारता रडतात
शेताकडेचा तो ओढा
आज उदास वाहतो
ताफा जेसिबी यंत्राचा
फाळ उरात साहतो
येडीखुळी पायवाट
मनोमनी थरथरे
भय पापणी, पंखात
आसोसून फरफरे
टाहो फोडी काळीमाय
ट्रक शवपेटी भरे
धूळ उडवीत दूर
उरी धरतीच्या चरे
शेत झाले हमरस्ता
गाड्या जाती वेगे वेगे
भूमिहीन आम्ही होता
दुरावले सारे सगे
मुबारक उमराणी
सांगली
९७६६०८१०९७.