You are currently viewing योग्य व्यवस्थापन आणि वेळेवर वसूली तीच यशस्वी पतसंस्था – मनिष दळवी

योग्य व्यवस्थापन आणि वेळेवर वसूली तीच यशस्वी पतसंस्था – मनिष दळवी

सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय निमशासकीय पतपेढीच्या कासार्डे शाखेचे उद्घाटन

कणकवली

योग्य व्यवस्थापन आणि शंभर टक्के कर्ज वसुली ही सहकार पतसंस्थेच्या यशस्वी वाटचालीतील अतिशय महत्त्वाचे बाब असते. सहकारी संस्था टिकवण्यासाठी प्रत्येकाने सभासदांनी सहकार्याच्या भूमिकेतून सहकार्य करणे गरजेचे आहे.सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या पतसंस्थेसाठी सदैव मदतशील राहणार असून, शासकीय निमशासकीय ही पतसंस्था जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्था म्हणून नावारूपास येण्यासाठी आपण एकत्रित मिळून काम करूया असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी कासार्डे येथे केले.

सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय निमशासकीय सहकारी बँक कर्मचारी सहकारी पतपेढी मर्यादित सिंधुदुर्गच्या कासार्डे येथील नूतन शाखेच्या उद्घाटन प्रसंगी मनिष दळवी बोलत होते.याप्रसंगी व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय निमशासकीय सहकारी बँक कर्मचारी सहकारी पतपेढी मर्या.सिंधुदुर्ग पतसंस्थेचे जिल्हा अध्यक्ष शरद नारकर,जि.प.उ.सह. संस्था सिंधुदुर्गाच्या कार्य अधिक्षिका श्रीम.उर्मिला यादव, वैभववाडीचे गटविकास अधिकारी तथा कासार्डे गावचे सुपुत्र जयप्रकाश परब, उद्योगपती सुनील नारकर, कासार्डे गावच्या सरपंच सौ.निशा नकाशे, उपसरपंच गणेश पाताडे,पो.पाटील महेंद्र देवरुखकर, तंटामुक्ती समिती चे अध्यक्ष राजकुमार पाताडे, खरेदी विक्री संघाचे संचालक श्रीपत पाताडे, कासार्डे सोसायटी चेअरमन दिपक सावंत,सिंधुदुर्ग जिल्हा बँक कासार्डे शाखेच्या व्यवस्थापिका श्रीम.रेणुका कातरूट,पतसंस्थेचे मार्गदर्शक संजय पाताडे,संस्थापक अध्यक्ष महेश गावडे,उपाध्यक्ष प्रसाद कुंटे,जूनी पेन्शन हक्क राज्य संघटनेचे अध्यक्ष प्रवीण पाताडे, केंद्र प्रमुख श्री.दहिफळे, श्री.आडोलीकर,आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

कासार्डे येथील नूतन शाखेच्या उद्घाटन सोहळ्याचा प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाला. याप्रसंगी महेश गावडे यांनी आपल्या प्रास्ताविकात या पतसंस्थेचा सन.२०१३ पासूनच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला.
उद्योगपती सुनील नारकर, पतसंस्था मार्गदर्शक संजय पाताडे,श्रीम.उर्मिला यादव आदींनी मनोगत व्यक्त करतांना पतपेढीच्या कार्याचे विशेष कौतुक करून कासार्डे शाखेला शुभेच्छा दिल्या.तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष शरद नारकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात पतसंस्थेच्या विविध योजनांची माहिती देताना ‘ना नफा! ना तोटा! या तत्वावर आधारित पतसंस्थेचे कार्य सभासद हित लक्षात घेऊन सुरू राहील अशी ग्वाही दिली.

याप्रसंगी पतसंस्थेचे सर्व संचालक तसेच सचिव रामचंद्र दळवी,शाखा प्रमुख योगिता परब व शुभम चव्हाण यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम. दिनश्री पेडणेकर यांनी तर आभार उदय शिरोडकर यांनी मानून कार्यक्रमाची सांगता केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा