*लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध ५ गडी राखून विजयी*
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
आयपीएल २०२३च्या १०व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादला लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध ५ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. यासह हा संघ गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर पोहोचला आहे. यासोबतच लखनौचा संघ या विजयासह गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचला आहे. फिरकी खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करताना हैदराबादचा संघ अवघ्या १२१ धावांवर गारद झाला. पाच विकेट्स गमावून लखनौने २४ चेंडू बाकी असताना लक्ष्य गाठले आणि सलग दुसरा विजय नोंदवला.
लखनौ सुपर जायंट्सकडून कृणाल पांड्याने तीन बळी घेतले आणि फलंदाजी करताना ३४ धावा केल्या. त्यालाच सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याचवेळी अमित मिश्राने दोन, यश ठाकूर आणि रवी बिश्नोईने प्रत्येकी एक विकेट घेतली. कर्णधार राहुलने फलंदाजीत सर्वाधिक ३५ धावा केल्या. हैदराबादकडून आदिल रशीदने दोन तर भुवनेश्वर, फजल हक फारुकी, उमरान मलिक यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
या सामन्यात हैदराबादच्या बाजूने काहीही झाले नाही. गेल्या मोसमातही हा संघ प्ले ऑफमध्ये पोहोचू शकला नव्हता. यानंतर या संघाच्या कर्णधारापासून प्रमुख खेळाडूपर्यंत सर्व काही बदलण्यात आले. या मोसमात हा संघ चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा होती, परंतु आतापर्यंत सनरायझर्स हैदराबाद स्पर्धेतील सर्वात खराब संघ म्हणून पुढे आला आहे.
पहिल्या सामन्यात हैदराबादचा कर्णधार एडन मार्करामसह अनेक महत्त्वाचे खेळाडू नव्हते. अशा स्थितीत संघाच्या पराभवाचा संबंध कर्णधाराच्या अनुपस्थितीशी जोडला जात होता, मात्र या सामन्यात कर्णधाराला एक चेंडू खेळून नाणेफेकीत सामील होण्याशिवाय विशेष काही करता आले नाही.
राजस्थानविरुद्धच्या सामन्यातही हैदराबादचे फलंदाज अपयशी ठरले. तेव्हा २०० पेक्षा जास्त धावा केल्याचं दडपण होतं असं मानलं जात होतं. त्यामुळे चुकीचे शॉट खेळून फलंदाज बाद झाले. मात्र, या सामन्यात प्रथम फलंदाजी करतानाही संघाची स्थिती तशीच होती. सर्व आघाडीचे फलंदाज एक एक करून बाद झाले. राहुल त्रिपाठीने धावा केल्या तेव्हाही त्याचा स्ट्राईक रेट फक्त ८५ होता. त्याचवेळी वॉशिंग्टन सुंदरनेही ५७ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. संघाच्या पाच फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला नाही. सात आघाडीच्या फलंदाजांबद्दल बोलायचे तर तिघांना दुहेरी आकडा गाठता आला नाही. दोघांचा स्ट्राइक रेट १०० पेक्षा कमी होता. अब्दुल समद (१० चेंडूत २१ धावा) आणि अनमोलप्रीत सिंग (२६ चेंडूत ३१ धावा) यांनाच समाधानकारक कामगिरी करता आली.
सनरायझर्स हैदराबादचा संघ नेहमीच चांगल्या गोलंदाजीसाठी ओळखला जातो, मात्र या हंगामात या संघाची गोलंदाजीही फ्लॉप ठरली आहे. सर्वात सीनियर गोलंदाज भुवनेश्वरने या सामन्यात केवळ दोन षटकांत पाच वाईड चेंडू टाकले. फजलहक फारुकीने एकट्याने चांगली गोलंदाजी केली. टी नटराजन गेल्या सामन्यात लयीत दिसला होता, मात्र या सामन्यात त्यालाही एकही विकेट घेता आली नाही.
एडन मार्करामचं नेतृत्वच ह्या सामन्यातील पराभवाचे सर्वात मोठे कारण होते. फिरकी खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करताना तो चार प्रमुख गोलंदाजांसह प्लेइंग-११ मध्ये उतरला. तर त्याच्या संघात दोन अष्टपैलू खेळाडूही होते. फलंदाजीच्या वेळी तो स्वत: पहिल्याच चेंडूवर बाद झाला. यानंतर राहुल त्रिपाठी आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी संथ फलंदाजी केली. त्यामुळे संघाला भक्कम धावसंख्या गाठता आली नाही.
लखनौच्या फिरकी गोलंदाजांनी पहिल्या डावात चांगली कामगिरी केली. अशा स्थितीत हैदराबाद संघ मयंक मार्कंडेयाचा आपल्या संघात समावेश करेल, अशी अपेक्षा होती. अशा स्थितीत मार्करामने फजलहक फारुकीला संघात सामील करून घेतले. फारुकीने चांगली गोलंदाजी केली, पण एकच विकेट घेऊ शकला. मार्करामच्या निर्णयाचा परिणाम असा झाला की गोलंदाजीच्या वेळी त्याच्याकडे फक्त एक प्रमुख फिरकी गोलंदाज (आदिल रशीद) होता.
हैदराबादला छोट्या धावसंख्येचा बचाव करण्यासाठी विकेट्स घेण्याची गरज होती आणि या खेळपट्टीवर फक्त फिरकीपटूंना सहज विकेट मिळतील हे सुरुवातीपासूनच स्पष्ट झाले होते. अशा स्थितीत मार्करामने आपला मुख्य फिरकी गोलंदाज रशीदला केवळ तीन षटके दिली. दुसरा फिरकीपटू सुंदरचे फक्त एकच षटक केले आणि तेही पॉवरप्लेमध्ये. मार्करामने स्वतः दोन षटके टाकली. फिरकीपटूंनी फिरकी खेळपट्टीवर फक्त सहा षटके टाकली, तर वेगवान गोलंदाजांनी १० षटके टाकली. अशा स्थितीत संघाचा पराभव निश्चित होता.
लखनौच्या विजयात कृणाल पांड्याने सर्वाधिक योगदान दिले. त्याने प्रथम गोलंदाजी करताना तीन महत्त्वाचे बळी घेतले आणि १५ निर्धाव चेंडू टाकून विरोधी संघावर दबाव निर्माण केला. यानंतर फलंदाजी करताना २३ चेंडूत ३४ धावांची खेळी केल्याने कर्णधार राहुल आणि उर्वरित फलंदाजांचे कामही सोपे झाले. लखनौच्या विजयाचे सर्वात मोठे कारण म्हणजे फलंदाजांचा संयम. अवघड खेळपट्टीवर छोट्या धावसंख्येचा पाठलाग करताना कर्णधार राहुल आणि बाकीच्या फलंदाजांनी फारशा वेगाने धावा काढण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे संघाच्या विकेट्स शिल्लक राहिल्या आणि संघाला सोळा षटकांत १२७ धावा करता आल्या.