You are currently viewing ओढ गावाची…!

ओढ गावाची…!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा.सदस्य तथा लालीत्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर लिखित अप्रतिम ललित लेख*

*ओढ गावाची…!*

*ओहळाच्या वाहत्या पाण्यात*
*बालपणी सोडायचो कागदी नाव*
*डोंगरदऱ्यांच्या कुशीत वसला*
*निसर्गसंपन्न आरोस माझा गाव…*

गाव म्हटलं की आठवतात बालपणीच्या कित्येक गोष्टी… भावंडांसोबत मजेत घालवलेलं बालपण…शेणाने सारवलेल्या अंगणाची पेळेवर डोकं टेकवून मातीच्या गालिच्यावर दिवस रात्र पहुडणे… अंगावर पांघरायला झावळ्यांचा मांडव अन् अवकाशातील चांदण्यांची चादर… कणकेच्या बांबूच्या बेटातून घुमत काजूच्या झाडांमधला बोंडूचा मंद सुवास घेऊन वाहणारा थंड वारा जणू कानात अंगाई गायचा…हलकेच अंगावरून मायेने हात फिरवून गारव्यात शांत झोप देत होता… दिवसा उन्हाळ्यातील कडाक्याचे ऊन अन् रात्रीत मातीचा गारवा जणू पंचतारांकित हॉटेलात झोपल्याची जाणीव करून द्यायचा… शेणाच्या जमिनीवर लोळूनही अंगाला कधीच शेण लागत नव्हते… तर स्पर्श व्हायचा तो आईने सारवलेल्या मायेच्या हातांचा….!
आता शहरात ब्रेकफास्ट मिळतो…गावात मिळायची ती न्याहारी…! पितळीच्या चकचकीत पिवळ्या परातीत मळलेली नाचणीची लालसर किंवा तांदळाच्या पांढऱ्या शुभ्र पिठाची… तव्यावर भाजून चुलीतील निखाऱ्यावर गरगरीत फुगलेली मऊशार भाकरी…अन् गोठ्यातील गाईच्या दुधावर आलेली मायेची साय घातलेली दुधाचीच चाय… तर कधी सोबत आंबा घातलेली खोबऱ्याची चटणी नाहीतर मीठ नि पाणी घातलेलं मसाल्याचं तिखट…! पण लागायचे मात्र लज्जतदार…! दुपारच्या जेवणात भाजीचा पत्ताच नसायचा…मग न्याहारीला भाजी आणायची कुठून…? खांद्यावर टोपली अन् हातात काटा… (बोंडू गोळा करायची तार ठोकलेली काठी) घेऊन स्वारी चढायची काजूच्या बागांचा डोंगर… काजूच्या झाडाखाली पडलेला एक एक बोंडू जमा करत… पडलेले बोंडू वेचायचे…झाडावरचे काढायचे नाहीत हा… तशी पद्धतच आहे. संध्याकाळी पुन्हा तोच फेरा… बोंडू जमा करून आणायचे… बोंडू पिळून काजू वेगळ्या करायच्या अन् बोंडू नेणारी गाडी आली की डबे भरून मोजून द्यायचे… पावती घ्यायची…कामगिरी फत्ते…!
दिवसभर बोंडूच्या रसाने माखलेलं अंग मग संध्यासमयी झोकून द्यायचे बांधावरून ओहोळाच्या अडवलेल्या पाण्याच्या बंधाऱ्यात अन् शुद्ध होऊनच काठावर यायचं…! कधी रींगणीच्या रींगा (रिठा) तर कधी ५०१ बारने अंगाला एवढा फेस काढायचा की, अंतराळातून वीर उतरलाय असच वाटायचा… पुन्हा एकदा सूर मारून अंगाला पाण्यात झोकून द्यायचं… मनसोक्त पोहून घ्यायचं… अंग ताजेतवाने व्हायचं… दिवसभराचा घाम, शिण निळ्या निर्मळ पाण्यात विसर्जित करायचा… अन् सख्खे चुलत भाऊ… मित्रांसह मोर्चा वळवायचा घराकडे…! पुन्हा एकदा पत्त्यांचे डाव मांडण्यासाठी घराच्या सारवलेल्या खळ्यात…(अंगण). आजही ते खळ्यातले पत्त्यांचे डाव… काजुंचे खेळ… छोट्या छोट्या भावंडांसोबतचे दिवस खुणावतात अन् ओढ लागते ती गावाची…!
बालपणी आपल्या गावासोबत आणखी एका गावाची ओढ असायची ते म्हणजे आजोळ…देवगड…! आजोळ नातवंडांच्या हक्काचं गाव… आजी, आजोबा,. मामा, मावशी प्रेमाची नाती… मायेचा पूर यायचा तिथे… आजीच्या मांडीवर झोपणे…मायेने केसात फिरणारी बोटे कधी शांत झोप द्यायची कधीच समजत नसायचं…! मामासोबत मासे पकडायला जाणे म्हणजे पर्वणीच… लांब लांब पसरलेल्या खाडीत जाळे टाकून पाण्यात बुडून मासे पकडणे अन् फडफड करणारे ताजे मासे मीठ, मसाला, कोकम टाकलेल्या सारातले खाणे म्हणजे जिभेला पाणी सुटणे…
आंब्याच्या बागेच्या जवळून गेलं तरी हापूसचा सुगंध जणू अंगात भिनायचा… नाकाच्या रंद्रा रंद्रांतून शरीरात शिरायचा…!
हापूसच्या त्या मोहक सुगंधाने कधी एकदा आंब्याच्या मिटक्या मारतो असं व्हायचं… अन् वाऱ्याची झुळूक येताच धरतीला आलिंगन देण्यासाठी झेपावणाऱ्या आंब्याला उचलून चावा घ्यायचा…! जिभेचे चोचले पुरवले की समाधान व्हायचं… हापूसची ती चव मग रेंगाळत रहायची जिभेवर…पुन्हा पुन्हा मुखतृप्तीसाठी…!
पावसाळ्यात चिखलात नांगरणी, पेरणी, तरवा काढणी, लावणी म्हणजे अवर्णनीय सुख…! हिरवागार तरव्याचा पेंडा डोईवर घेऊन चालताना वाटायचं… हिरवागार द्रोणागिरीच उचलून चालतोय… चिखलाने अंग माखायाचे अन् पावसाच्या सरीने पुन्हा धुवून निघायचे… अंगास चिखल लागण्याचे ते भाग्य सर्वांच्याच नशिबी नसतं… मुंबई पुण्यात नोकरी करणारे सुद्धा त्यासाठी गावच्या ओढीने येतात गावाकडे शेती करायला. सड्यावर करवंदाच्या झाडीत काटेकुटे घुसले तरी रानातली मैना जणू शीळ घालून बोलावते म्हणून घुसायचं… करवंद चाखताना सुद्धा शबरीने बोरं चाखली तशी आतून लाल रंग आहे की पांढरा हे पाहूनच तोंडात घालायची अनोखी पद्धत…! फणसाच्या झाडाखालून जाताना पिकलेल्या फणसाचा वास आला की, झाडावर बसूनच रसाळ फणसावर ताव मारायचा. आपल्याच मस्तीत जीभेचा रंग गडद जांभळा होईस्तोवर जांभळं खायची… विकत आणायची अन् धुवून खायची सवय होतीच कुणाला…?
*ओढ असते स्वप्नांची*
*ओढ आपल्या माणसांची*
*जगावसं वाटतं घेऊन…*
*सोबत गेलेल्या क्षणांची…!*
नोकरी व्यवसाय अन् पोटापाण्यासाठी गाव सुटलं… घरट्यात असेपर्यंत पिल्लांना चिऊताई खाऊ आणून भरवते अन् पिल्ले मोठी होताच स्वतःचं जीवन जगण्यासाठी… नवं जग पाहण्यासाठी…दूर आसमंतात फिरण्यासाठी भुर्रर्रकन उडून जातात… अगदी तसंच अनेकजण गावाची वेस ओलांडतात आणि नव्या दुनियेत स्वतःला गुंतवून घेतात… गाव मात्र वाट पाहत असते …दूर गेलेली पिल्लं कधी येणार अन् पोरांविना सुनी सुनी झालेली घरं कधी गजबजणार याचीच…! जशी वसंत ऋतू येतातच झाडावेलींना बहर येतो…आम्रतरूवर आंबे लगडतात…काजूच्या बोंडांचा सुवास दूर दूर पसरतो… काळी मैना करवंदीच्या झाडीतून हळुवार साद घालते… जांभळ्या रंगाचा सडा झाडाखाली अंथरूण घालतो…पिकलेल्या रसाळ काटेरी फणसाच्या भोवती कीटक पिंगा घालतात… पाण्याच्या शोधात चिमणी पाखरे घराच्या खिडकीवर चोचीने टकटक करतात… तसंच…
गावाच्या ओढीने चाकरमानी सुट्ट्या घेऊन मळलेल्या लाल वाटेने रणरणत्या उन्हातून आपल्या गावच्या घराचा रस्ता धरतात…
*अनवाणी चालताना तेव्हा*
*भाजत होते भेगाळलेळे पाय..*
*सुटबुट असताना अंगावर*
*सुख बालपणीचे भेटत नाय*

ढोलावर पडणारी काठी, गावची होळी, शिमग्याचं रोंबाट… देवळातील अवसार, जत्रेची धामधूम, मळ्यातलं क्रिकेट, झाडावरची सुरकाठी… गणपतीतील भजने, देवळातील आरती…शेजार पाजार नि गप्पांचे फड… आठवताच जुने दिवस मन गावी पोचते…दिसतात नजरेसमोर तेव्हा जगलेले, मळकटलेल्या कपड्यातील… शेतावरून येतानाचे… तुटलेल्या चपलांना तांगडून घातलेले…बैलगाडीच्या हौदात पाय सोडून बसलेले…पण आनंदात गेलेले दिवस… मन सैरावैरा धावते… बिलगण्या आपल्या माणसांना…पाहण्या रखरखत्या उन्हात सुद्धा हिरवीगार असणाऱ्या तुळशी वृंदावनाला… शाळेत जाताना सोबत केलेल्या बालपणीच्या मैत्रिणीला… ओढ वाढत जाते… मन एसटी थांब्यावर उतरते… पाहून गावची लाल माती बोटांनी भाळी लावते… नदीच्या गार गार पाण्यात मनसोक्त डुंबते…ताजेतवाने होऊन गिरोबाच्या चरणी लीन होते… पायीचे तीर्थ पिउनी सारी दुःख विसरते… “आनंदाचे डोही आनंद तरंग…” अशीच काहीशी गावच्या भूमीचा स्पर्श होताच मनाची स्थिती होते… बेधुंद होऊन मन गावचा फेरफटका मारते…गावकऱ्यांच्या भेटीगाठी होताच… चारीधाम फिरल्याचे सुख गाठी बांधते…
*समीप असता कमी असलेली ओढ*
*अंतर वाढलं की आपोआपच वाढते*
*दूर गेल्यामुळेच तर जवळ येण्याची…*
*खरी गोडी चाखता येते*

©[दीपी]
दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६

 

*संवाद मीडिया*

*👮‍♂️!! खुशखबर! खुशखबर!!👮‍♂️*

*👮‍♂️भारतीय सैन्यदलात (आर्मी, नेवी, एअर फोर्स) अधिकारी होण्याची नामी संधी.*👮‍♀️

*_सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली येथे 15 दिवसांचे निवासी NDA प्रवेश परीक्षा व SSB interview मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे._*

*_🔸सदर शिबिर १ एप्रिल २०२३ ते १५ एप्रिल २०२३ या कालावधीत इ. ११वी व १२वी (विज्ञान) झालेल्या विद्यार्थ्यांकरिता आहे. सदर प्रशिक्षण शिबिर निवासी असून यामध्ये प्रामुख्याने NDA लेखी परीक्षेचे सखोल मार्गदर्शन व SSB मुलाखत प्रशिक्षण, साहसी खेळ, obstacle training, स्वयं सुरक्षा, रायफल शूटिंग व personality development तसेच सर्व प्रकारचे खेळ यांचा समावेश आहे._*

*_👇खालील लिंक वर क्लिक करून  संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा_*

https://forms.gle/xxSJxjZSbXXao8hc9

*अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा.*

*📲राजेंद्र गावडे : 9403366229*

*📲 नागेश पांढरे : 9422073840*

*📲Office : 9420195518, 7822942081*

*Advt link …👇*

*————————————–*

*संवाद मीडिया*

*👮‍♂️👮‍♂️सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली👮‍♂️👮‍♂️*

*🔺समर हॉलिडे कॅम्प*🔺

*_🔹The colonel’s Academy for adventure & aero spots आणि सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोलीच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली येथे उन्हाळी सुट्टीत साहसी व व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण शिबिरे_*

*🔹शिबिर कालावधी – 15 एप्रिल ते 21 एप्रिल 2023 व 22 एप्रिल ते 28 एप्रिल 2023*

*🔹वयोमर्यादा – 10 वर्षावरील मुली व मुले*

*🔹प्रशिक्षणाचे विषय🔹*

*_🔸पिटी, योगा, कराटे, रॅपलिंग, ट्रेकिंग, व्हॅली क्रॉसिंग, रॉक क्लाइंबिंग, फायरिंग, लीडरशिप डेव्हलपमेंट, सेल्फ डिफेन्स, बर्ड अँड प्लांट ऑब्झर्वेशन, स्पोर्ट, ग्रुप डिस्कशन, गेस्ट लेक्चर वगैरे_*

*👇खालील लिंक वर क्लिक करून संबंधित माहिती सर्व फॉर्म सबमिट करावेत*

https://forms.gle/CVGoWJbpoiQ4yeGW8

*अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा.*

*📲राजेंद्र गावडे : 9403366229*

*📲 संजय शिंदे : 9307051091*

*📲Office : 9420195518, 7822942081*

*Advt link …👇*

*————————————–*

प्रतिक्रिया व्यक्त करा