*भारतासाठी एकदिवसीय सामन्यात पहिला चौकार मारणारे सुधीर नाईक यांचे वयाच्या ७८ व्या वर्षी निधन*
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
भारताचे माजी सलामीवीर सुधीर नाईक यांचे बुधवारी निधन झाले. ते अनेक दिवसांपासून आजारी असल्याने त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते ७८ वर्षांचे होते. बीसीसीआयने सुधीर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी भारतासाठी तीन कसोटी आणि दोन एकदिवसीय सामने खेळले. भारतासाठी एकदिवसीय सामन्यांमध्ये पहिला चौकार मारण्याचा विक्रमही सुधीर नाईक यांच्या नावावर आहे. लीड्समधील हेडिंग्ले येथे १९७४ मध्ये इंग्लंडविरुद्ध त्यांनी ही कामगिरी केली होती.
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, नुकतेच सुधीर नाईक बाथरूममध्ये पडले आणि त्याच्या डोक्याला दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांना मुंबईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते कोमात गेले आणि त्यातून ते बाहेर आले नाहीत. सुधीर हे मुंबई क्रिकेटमधील अत्यंत प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व होते तसेच रणजी ट्रॉफी विजेते कर्णधारही होते. १९७०-७१ च्या रणजी हंगामात त्याने मुंबई संघाचे नेतृत्व केले आणि विजेतेपद पटकावले.
मुंबई क्रिकेटच्या या दिग्गजाने मुंबई आणि भारतीय क्रिकेटसाठी वेगवेगळ्या भूमिका आणि जबाबदाऱ्या पार पाडल्या. सुनील गावस्कर, अजित वाडेकर, दिलीप सरदेसाई आणि अशोक मांकड कॅरिबियनमध्ये इतिहास रचण्यात व्यस्त असताना सुधीर यांनी १९७१ मध्ये मुंबईला रणजी ट्रॉफी जिंकून दिली. त्यांनी ८५ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ४३७६ धावा केल्या, ज्यात सर्वाधिक नाबाद २०० धावा आहेत.
१९७२ मध्ये जेव्हा सर्व स्टार खेळाडू परत आले तेव्हा सुधीर यांना अंतिम ११ खेळाडूं मधून वगळण्यात आले हे भारतीय क्रिकेटचं दुर्दैव म्हणता येईल. १९७४ मध्ये सुधीर यांना बर्मिंगहॅम कसोटीत इंग्लंडविरुद्ध पदार्पण करण्याची संधी मिळाली आणि त्यांनी या कसोटीच्या दुसऱ्या डावात ७७ धावा केल्या. मात्र, भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. १९७४ नंतर त्यांची कारकीर्द फारशी टिकू शकली नाही आणि ते भारतीय संघात पुनरागमन करू शकले नाहीत.
खेळाडू म्हणून कारकीर्द संपल्यानंतर मुंबई क्रिकेटला योग्य मार्ग दाखवण्यात सुधीर नाईक यांचाही मोठा वाटा आहे. झहीर खान, वसीम जाफर आणि नीलेश कुलकर्णी यांच्या कारकिर्दीला चालना देण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. याशिवाय पुढे मुंबईकडून खेळलेल्या अनेक खेळाडूंनाही त्यांनी मार्गदर्शन केले. सुधीर दीर्घकाळ वानखेडे स्टेडियमचे मुख्य क्युरेटरही होते. आयसीसी विश्वचषक २०११ साठी स्टेडियम तयार करण्याचे श्रेय देखील सुधीर यांना जाते. वानखेडे स्टेडियमचे पिच क्युरेटर म्हणून त्यांनी कधीच पगार घेतला नसल्याचे सांगितले जाते.