*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच, गझल मंथन, गझल प्राविण्य समुहाच्या सन्मा.सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री शोभा वागळे लिखित अप्रतिम लेख*
*गुड फ्रायडे:-*
गुड फ्रायडे हा ख्रिस्ती धर्मातील एक महत्त्वाचा दिवस आहे.
ख्रिश्चन धर्मातील समजूतीप्रमाणे याच दिवशी येशू ख्रिस्ताला क्रॉस वर चढवण्यात आले होते. याची आठवण ठेवून ख्रिस्ती धर्मात हा दिवस शोक दिवस मानला जातो. या दिवसाला गुड फ्रायडेला होली फ्रायडे, ब्लॅक फ्रायडे किंवा ग्रेट फ्रायडे म्हणूनही ओळखले जाते. या दिवशी काही ख्रिश्चन बांधव उपवास ठेवतात, ख्रिश्चनांचा चाळीस दिवसांचा उपवास काळ म्हणजे लेंट सिझन दरवर्षीं मार्च-एप्रिल याच काळात येतो. नाताळाची आणि इतर ख्रिस्ती सणांची तारीख ठरलेली असते, लेन्ट सिझन आणि यामध्ये येणाऱ्या झावळ्यांचा रविवार (पाम संडे), गुड फ्रायडे आणि इस्टर संडे मात्र याला अपवाद असतो.
या काळात मांस खाल्ले जात नाही, परंतु फळे, भाज्या, मासे, दूध, अंडी आणि गहू यांचे सेवन केले जाते.
जेरुसलेम प्रांतात भगवान येशू ख्रिस्त हे ख्रिश्चन धर्माचा प्रसार, प्रचार करत होते. ख्रिस्ती धर्मानुसार येशू ख्रिस्त हे परमेश्वराचे पुत्र होते. लोकांना ते अज्ञानाच्या अंधारातून बाहेर येण्यासाठी शिक्षण देत होते. ते तत्कालीन धर्म प्रसारकांना आवडत नव्हते. यावेळी येशूंनी आपली बाजू लोकांना पटवून सांगितली जी काही लोकांना पटली देखील. त्यामुळे येशूंच्या जादूने लोक त्या धर्म प्रसारकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू लागले.
त्यावेळी काही कट्टरपंथी लोकांनी येशू ख्रिस्तांचा विरोध केला आणि त्या काळाच्या रोमन गव्हर्नर कडे येशू ख्रिस्ताची तक्रार केली. येशू ख्रिस्तांची शिकवण रोमन सत्ताधारकांसाठी धोक्याची मानली जाऊ लागली होती.
यहुदी म्हणजेच ज्यू लोकांनी क्रांती करू नये आणि आपली सत्ता अबाधित राहावी यासाठी गव्हर्नर ने येशू ख्रिस्तांना क्रॉस वर लटकवून जिवे मारण्याचा आदेश दिला. रोमन सैनिकांनी येशू ख्रिस्तांच्या डोक्यावर काट्याचे मुकुट ठेवून चाबकाचे फटके देत त्यांची धिंड काढली. येशूचे अनुयायी आक्रोश करत होते, क्षमा याचना करत होते, तर कर्मठ लोक मात्र येशूची अवहेलना करत होते.
पण गव्हर्नर आणि कट्टरपंथी लोकांपुढे यहुदी म्हणजेच ज्यू लोकांचे काहीही चालले नाही आणि शेवटी येशूना क्रॉसवर चढवलेच.
प्रभू येशू ख्रिस्ताला गोलागोथा नामक वधस्तंभावर अडकवले आणि त्यांच्या हाता, पायांना खिळे ठोकूनयांना शिक्षा दिली.
अशा वेळी सुद्धा येशू ख्रिस्ताने आपल्या शेवटच्या क्षणी त्यांच्यावर अन्याय करणाऱ्या लोकांबद्दल देवाकडे क्षमा मागितली. ते म्हणाले, “हे परमेश्वरा, हे लोक काय करत आहेत ते, त्यांचं त्यांना कळत नाही. या सगळ्यांना त्यांच्या पापांसाठी क्षमा कर, माफ कर,” असे परमेश्वराला विनवत त्यांनी आपले प्राण सोडले असे ख्रिश्चन बांधव मानतात.
ज्यादिवशी प्रभू येशू ख्रिस्तांना वधस्तंभावर चढवण्यात आले तो दिवस शुक्रवारचा होता. त्यामुळे येश ख्रिस्तांच्या स्मरणार्थ हा दिवस गुड फ्रायडे म्हणून साजरा केला जातो. ख्रिश्चन धर्माचे अनुयायी हा दिवस शोक दिन म्हणून साजरा करतात. या दिवशी ख्रिस्ती भाविक बांधव चर्चमध्ये जाऊन येशूने केलेल्या बलिदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात.
प्रभू येशूचे स्मरण केलं जातं आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याची प्रतिज्ञा घेतली जाते. हा ‘फ्रायडे’ म्हणजे शुक्रवार नंतरचा रविवार हा ईस्टर संडे.
ईस्टर म्हणजेच पुनरुत्थानाचा रविवार. ख्रिस्ती धर्म मान्यतेनुसार या दिवशी येशू ख्रिस्त मृतातून पुनः उठला, त्याचे पुनरुत्थान झाले. नव्या करारानुसार येशू गुड फ्रायडेच्या दिवशी क्रुसावर मरण पावले व तीन दिवसानी रविवारी पुन्हा जिवंत झाले असा ख्रिस्त बांधवांचा विश्वास आहे.
गूड फ्रायडे निमित्त बहुतांशी सरकारी व खाजगी कार्यालये व शैक्षणिक संस्थांना सुटी असते. ख्रिस्ती धर्मातील समजुतीप्रमाणे या दिवशी येशू ख्रिस्ताला क्रॉसवर चढवण्यात आले. याची आठवण ठेवून ख्रिस्ती जगात हा दिवस शोकदिवस म्हणून मानला जातो. काही ख्रिस्ती पारंपारिक देशांमध्ये राष्ट्रीय दुःखवट्याप्रमाणे साजरा होतो. या दिवशी कोणत्याही आनंदायक कार्यक्रम साजरा करण्यात येत नाहीत. काही भाविक लोक चर्च मध्ये जाऊन येशूने केलेल्या बलिदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात.
पण या दिवसाबाबत अनेकांमध्ये अनेक गैरसमजही बघायला मिळतात. अनेकांना हे माहीतच नसतं की हा एक दुःखाचा दिवस आहे. त्यामुळे काही लोक या दिवसाच्या शुभेच्छा देताना दिसतात. ते चुकीचे आहे.
येशूच्या बलिदानाचा दिवस “गुड फ्रायडे” म्हणून ओळखला जातो. गुड फ्रायडे नंतरचा येणारा रविवार म्हणजेच ईस्टर संडे हा येशूचा परत प्रकटण्याचा दिवस असतो. त्यामुळे ईस्टर संडेचा हा दिवस ख्रिस्ती बांधव मोठ्या आनंदात साजरा करतात.
ख्रिस्ती धर्मात, येशू ख्रिस्ताचा मृत्यू हा पवित्र ग्रंथ बायबल मधील उल्लेख केलेला सर्वात महत्त्वाचा विभाग आहे. ख्रिश्चनांचा असा विश्वास आहे की मृत्यूने त्याने मानवजातीची सर्व पापे काढून घेतली आणि त्याच्या सुळामुळे त्यांचे तारण झाले असे मानले आहे.
गुड फ्रायडे च्या दिवशी चर्च मध्ये सामुहिक प्रार्थनेचे आयोजन केले जाते. बर्याच चर्चमध्ये क्रॉस स्टेशनचे क्रॉस असतात. काही लोक दुपारच्या वेळी जवळच्या लोकांसोबत एकत्र येतात. यावेळी आपल्या साथीदारांसोबत चहा-बन खातात. काही लोक या दिवशी उपवास करतात, खाणे टाळतात. काही जण दुपारी बरोबर 3 वाजता प्रार्थना करतात. त्यांच्या मते येशूच्या निधनाची हीच वेळ होती. त्यामुळे गुड फ्रायडे हा दिवस सेलिब्रेशनचा नसून मौन बाळगत पाळला जातो.
शोभा वागळे
मुंबई.
8850466717