कणकवली
सिंधुदुर्गात येणाऱ्या पर्यटकांना पर्यटनस्थळांपर्यंत ने-आण करण्यासाठी मिनी बससेवा सुरू केली जाणार आहे. सिंधुदुर्ग एस.टी. विभागाला मिनी बस मिळाल्यानंतर लगेच ही बससेवा सुरू होईल अशी माहिती आमदार नीतेश राणे यांनी दिली.
श्री.राणे यांनी आज कणकवली बसस्थानक आणि परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांनी एस.टी.चे विभाग नियंत्रक अभिजित पाटील यांच्याशी चर्चा केली. यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, संजय कामतेकर, माजी नगरसेवक अजय गांगण, सुशील पारकर, नगरसेवक विराज भोसले, प्रवासी संघटनेचे अशोक करंबेळकर, संतोष काकडे यांच्यासह कणकवली बस आगारातील पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
श्री.राणे म्हणाले, सिंधुदुर्गात पर्यटकांना पाहता येतील अशी अनेक स्थानके विकसित झाली आहेत. त्या स्थळांपर्यंत पर्यटकांना ने-आण करण्यासाठी मिनीबस जास्त उपयोगी ठरणार आहे. तसेच या माध्यमातून सिंधुदुर्गच्या पर्यटनालाही चालना मिळणार आहे. त्यादृष्टीने एस.टी. प्रशासनाने नियोजन करावे आणि मिनी बस दाखल होताच त्यानुसार कार्यवाही करा असे निर्देश एस.टी. अधिकाऱ्यांना दिले आहेत.
आमदार श्री.राणे यांनी बसस्थानक परिसराची पाहणी केल्यानंतर सांडपाणी व्यवस्था, पंख्यांची उपलब्धता नसणे, इमारतीची डागडुजी नसणे आदी मुद्दयावर नाराजी व्यक्त केली. तसेच दुरूस्तीची कामे तातडीने करून घ्या. खड्डे बुजविण्यात यावेत. सांडपाणी निचरा व्यवस्था करा असे निर्देश दिले.