You are currently viewing दिविजा वृध्दाश्रमाचे संचालक अविनाश फाटक ज्येष्ठ सेवाभुषण पुरस्काराने सन्मानित

दिविजा वृध्दाश्रमाचे संचालक अविनाश फाटक ज्येष्ठ सेवाभुषण पुरस्काराने सन्मानित

कणकवली

असलदे येथील दिविजा वृध्दाश्रमाचे संचालक अविनाश फाटक यांना ज्येष्ठ सेवाभुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यशवंतराव चव्हाण सेंटर आणि रिजनल रिसोर्स अँड ट्रेनिंग सेंटरच्या अंतर्गत सेंटर फॉर द स्टडी ऑफ सोशल चेंज यांच्या संयुक्त विद्यमाने “पिढीतील स्नेहसंबंद मेळा” आयोजित करण्यात आला. त्यावेळी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

अविनाश फाटक हे स्वस्तिक फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्याशिवाय दादर येथील साने गुरुजी बाल विकास मंडळाच्या माध्यमातून कार्यरत आहेत. स्वस्तिक फाऊंडेशनचा असलदे येथे दिविजा वृध्दाश्रम हा समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि कौटुंबिकदृष्ट्या आधार तुटलेल्या वृध्दांना कोणतेही शुल्क न घेता मोठा दिलासा आणि आपलेपणा देण्याचे काम गेली साडेचार वर्षे करत आहे. या वृध्दाश्रमात असे 42 वृध्द असून त्यांची घरच्याप्रमाणे सर्व काळजी घेतली जात आहे.

यासाठी अविनाश फाटक आणि त्यांचे सर्व सहकारी प्रयत्नशील आहेत. मुंबई आणि असलदे येथील या सामाजिक कामाची दखल घेऊन त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी मुंबई मनपा माजी महापौर ॲड. निर्मला सामंत प्रभावळकर, यशवंतराव चव्हाण केंद्राचे कोषाध्यक्ष हेमंत टकले, मुख्यकार्यकारी अधिकारी दीप्ती नाखले, दत्ता बाळसराफ, आरोग्य व ज्येष्ठ नागरिक विभागाच्या दीपिका शेरखाने, फेसकोम संस्थेचे अध्यक्ष अरुण रोढे, श्री. औधे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा