*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य तथा लालित्य नक्षत्रवेल समूह सदस्या लेखिका कवयित्री सौ.आदिती मसुरकर लिखित अप्रतिम ललितलेख*
*रामायणातील एक पात्र*
*हनुमान*
*भीमरूपी महारुद्रा, वज्र हनुमान *मारुती ॥*
*वनारी अंजनी सुता, रामदूता प्रभंजना !!*
*” वीर हनुमान”*
रामायणातील एक लोकप्रिय व्यक्तिरेखा जी आपल्या थोर संस्कृतीचा , उज्वल परंपरेचा व सामाजिक नीतिमूल्यांचा समृद्ध , विविधतापूर्ण व अमूल्य वारसा जगासमोर ठेवते.आपल्या देशात सर्वत्र हनुमानाची भक्ती केली जाते . भारतातील प्रत्येक गावात हनुमानाचे मंदिर आढळून येते . श्रीरामांचा परमभक्त असणारा हनुमान हा एक महान साधक असून अतूट भक्ती , निष्ठा , धैर्य आणि सुज्ञपणाचे तो प्रतीक आहे . महाकाव्य रामायणातील त्याची भूमिका प्रेरणादायक आहे.
हनुमान हा अंजनी व वनारस राज्याचा राजा केसरी यांचा पुत्र होता . चैत्र महिन्यातील पौर्णिमेला अंजनेरी येथे हनुमानाचा जन्म झाला . हे गाव व या नावाचा डोंगरी किल्ला महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात आहे . अंजनी देवीचा पुत्र असल्याने हनुमान अंजनेय म्हणूनही ओळखला जातो .
अंजनेय हा विलक्षण शक्ती असलेला ताकदवान महाबली होता . अनेक सिद्धी त्याला प्राप्त होत्या .एकदा बालपणी हनुमानाला पहाटेच जाग आली . त्याला खूप भूक लागली होती . आकाशात त्याला एक लाल चटूक रसदार पिकलेले फळ दिसले . ते फळ तोडून खाण्याचा हनुमानाला मोह झाला . उड्डाण घेत हनुमान त्या फळाजवळ झेपावला . पण काय आश्चर्य ! हनुमानाचे हात आगीने चळाचं कापू लागले . घाबरलेले ते फळ बोलले ,” अरे हनुमंता मी फळ नाही समस्त विश्वाला प्रकाशमय करून उजळवून टाकणारा मी सूर्य आहे . सूर्य त्याला समजावायचा . पण खोडकर हनुमंताला सूर्याला पकडण्यात एक वेगळीच मजा वाटायची . त्याचा तो रोजचाच खेळ बनला . सूर्य त्याला पाहूनच घाबरायचा . हे बघून इंद्रासहित सर्व देवांना काळजी वाटू लागली . सूर्य व पृथ्वीला वाचवण्यासाठी इंद्राने आपले वज्र हनुमानाच्या दिशेने फेकले . या प्रकाराने हनुमानाचे तोंड वाकडे झाले व तो बेशुद्ध पडला . खट्याळ हनुमान ध्यानधारणा करणाऱ्या ऋषीमुनींना खूपच त्रास द्यायचा . ऋषीमुनी हनुमानावर नाराज व्हायचे . एका ऋषीने हनुमानाला शाप दिला , “योग्य वेळ येऊन कोणीतरी आठवण करून देईपर्यंत तुझ्या अमोघ शक्तीचा तुला विसर पडेल .”
पुढे एके दिवशी हनुमानाने राजपुत्र सुग्रीव याची रानटी हत्ती पासून सुटका केली. कृतज्ञ सुग्रीवाने त्याची आपला सहाय्यक (प्रधान )म्हणून नेमणूक केली . सुग्रीवाचा भाऊ वालीने गैरसमजुतीने सुग्रीवाचे राज्य बळकावले . पराभूत झालेला सुग्रीव आपल्या साथीदारांसह ऋष्यमूक पर्वतावरच्या एका गुहेत गुप्तपणे राहत होता . त्याचा प्रधान हनुमानही त्याच्यासोबतच होता .
श्रीराम वनवासात असताना लंकेचा राजा रावणाने सीतेचे अपहरण केले . दुःखी होऊन राम लक्ष्मण सीतेचा शोध घेत असताना या ऋष्यमुक पर्वतावर आले. सुग्रीवाच्या आदेशानुसार हनुमानाने एका ब्राह्मणाचा वेश धारण करून श्री राम लक्ष्मणाची चौकशी केली . दोघांचेही तेजस्वी रूप पाहून हनुमान प्रभावित झाला. रामा विषयी हनुमानाच्या मनात अपार भक्तीभाव व प्रेम जागृत झाले . श्रीरामाच्या चरणाशी हनुमान लीन झाला . त्यांचा दास बनला .
सीतेचा शोध घेण्यासाठी हनुमान भारताच्या दक्षिण टोकावर गेला . हा महासागर कसा ओलांडायचा असा त्याला प्रश्न पडला . तेव्हा अस्वलांचा विद्वान राजा जांभवत यांनी हनुमानाला त्याच्या अमर्याद शक्तीची आठवण करून दिली . हनुमानाने डोळे मिटले व रामाचे स्मरण केले . त्याचा आकार वाढू लागला . संपूर्ण आकाश त्याने व्यापून टाकले . उडत उडत हनुमान लंकेला पोहोचला . हनुमानाने सीतामाईची भेट घेतली . रामाने दिलेली अंगठी सीतामाईच्या हातात ठेवून नम्रपणे सितेला नमस्कार केला . प्रभुरामांना त्याने सोबत आणून सीतामाईंची सुटका करण्याचे वचन दिले . रावणाच्या शिपायांनी हनुमानाला पकडले व रावणाच्या आज्ञेनुसार त्याच्या शेपटीला आग लावली . परंतु हनुमानाने झेप घेत घराघरांवर उड्या मारत रावणाची लंका जाळून टाकली.
पुढे राम व रावणामध्ये युद्ध सुरू झाले . श्रीराम हनुमानाच्या खांद्यावर बसून रावणाशी युद्ध करत होते . रावणाचा पुत्र इंद्रजीतने तीक्ष्ण बाणांनी लक्ष्मणावर जोरदार हल्ला केला . बाण लागून लक्ष्मण मुर्च्छित झाला . हिमालयातील द्रोणगिरी पर्वतावर आढळणारी संजीवनी ही वनौषधी लक्ष्मणाचा प्राण वाचवू शकत होती . हनुमान संजीवनी वनौषधी आणण्यासाठी द्रोणगिरी पर्वतावर गेला. हिख्यागार वनराईने पूर्ण पर्वत आच्छादला होता. दाटीवाटीन उभ्या असलेल्या त्या दाट झुडुपांमध्ये नेमकी संजीवनी वनौषधी कोणती ते हनुमानला ओळखता येईना . जास्त वेळ घालवणे योग्य नव्हते . हनुमानाने मनोमन प्रभूची प्रार्थना केली. *जय श्री राम**ची घोषणा देत त्याने आपली सर्व शक्ती एकवटली. प्रचंड द्रोणगिरी पर्वत त्याने आपल्या तळहातावर उचलून घेतला आणि आकाशमार्गे उडत उडत रणांगणावर आला.
रामाच्या तीक्ष्ण बाणांनी लंकेचा राजा दहा तोंडाचा रावण मरण पावला .असत्याचा नाश व सत्याचा विजय झाला .अयोध्येला गेल्यावर सीतेने एक उंची मोत्याचा कंठा हनुमानाला भेट दिला . पण हनुमान म्हणाला या मोत्यामध्ये राम नाही . राम माझ्या हृदयात आहे . तो हार त्याने परत केला आणि आपले हृदय फाडून राम दर्शन घडवले . श्री रामाने हनुमानाला घट्ट मिठी मारली व आशीर्वाद दिला , “तुझ्या निस्वार्थी सेवेची महती , पिढ्यानपिढ्या गाजत राहील !”
हनुमान हा सप्त चिरंजीवांपैकी एक चिरंजीव . तो अजूनही जिवंत आहे असे मानले जाते . जगात ज्या ज्या ठिकाणी जेव्हा जेव्हा श्रीरामाचे नाव घेतले जाते तेथे मारुती हजर असतो .
विद्यार्थी बुद्धिमत्तेकरिता तर मल्ल आणि सैनिक धैर्य व शक्ति करिता हनुमानाची उपासना करतात . हनुमानाच्या कथा वाचून मुलांना निर्भय बनण्यास व अर्थपूर्ण आयुष्य जगण्यास प्रेरणा मिळते . सामाजिक मूल्ये वेगाने बदलत असणाऱ्या युगात , नवीन पिढीला आपल्या पवित्र शास्त्रातील नीती मूल्यांची ओळख करून देण्यासाठी रामायणातील कथा माहीत असणे गरजेचे आहे .
हनुमान हे श्रीरामाचे भक्त होते . प्रत्येक माणसाने सुद्धा हनुमानाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा . आपल्या अंतरात असणाऱ्या काम , क्रोध , मोह , लोभ , मद , मत्सर या षडविकारांवर विजय मिळवावा .
*”श्रवण-मनन निजध्यास “* या त्रिवेणी संगमावर नित्य स्नान करावे . श्री सेवा दास्यभक्तीमध्ये राहून शेवटच्या अंतापर्यंत परमेश्वराची प्रार्थना उपासना केली तर हा मनुष्य जन्म नक्कीच सार्थकी लागेल .
*मनोजवं मारुततुल्यवेगं ।*
*जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् ।*
*वातात्मजं वानरयूथमुख्यं ।*
*श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ॥*
*🖋️© सौ आदिती मसुरकर*
*कुडाळ , सिंधुदुर्ग*
*संवाद मिडिया*
*गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आपल्या हक्काचे घर बुक करा*
*🏬 देवगिरी हाइट्स 🏬*
*आठ मजली भव्य प्रकल्प…*
*1 BHK & 2 BHK फ्लॅट्स*
*🏤”दर्पण कन्स्ट्रक्शन”*
*🏚️सावंतवाडी🌳*
*घेऊन आले आहेत…! अगदी 🏞️नरेंद्र डोंगराच्या🌳 कुशीत…! प्रसिद्ध माठेवाडा🛕 परिसरात*
*🏬 देवगिरी हाइट्स 🏬*
*आठ मजली भव्य प्रकल्प…*
*📲 अधिक माहितीसाठी संपर्क साधा :-*👇
*9890968845 / +918379896943*
*🏠ऑफिस :- 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग*
*🌐Advt Web link*
———————————————