सावंतवाडी
परीक्षा संपता न संपताच तो वेध लागतात ते सुट्टीचे! यावर्षी सुट्टीचे नियोजन करताना आंबोली येथे साहस शिबीरामध्ये सहभागी होण्याची संधी चालून आली आहे.
सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट एक्स सव्हिसमन असोसिएशन संचलित द कर्नल्स अकॅडमी फॉर ॲडव्हेन्चर ॲण्ड ॲरो स्पोर्टस आणि सैनिक स्कूल, आंबोली यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी साहस आणि नेतृत्व विकास निवासी साप्ताहिक शिबीर सैनिक स्कूल, आंबोली येथे १५ एप्रिल २०२३ ते २१ एप्रिल २०२३ व २२ एप्रिल २०२३ ते २८ एप्रिल २०२३ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहेत.
आंबोलीतील जैवविविधतेचा अभ्यास, सह्याद्रीच्या कडेकपारीत साहसाची अनुभूती, आंबोलीतील रानमेवा चाखणे, वन भोजन, मोबाईल आणि सोशल मिडीयापासून दूर राहून स्वच्छंद भटकंतीचा अविस्मरणीय अनुभव या शिबीरात घेता येईल.
१० वर्षावरील मुलामुलींकरिता सदर शिबीरामध्ये प्रवेश देण्यात येईल. या साहस शिबीरामध्ये रॉक क्लायबिंग, व्हॅली क्रॉसिंग, रॅपलिंग, माऊंटनियरिंग, जंगल सफारी, ट्रेकिंग, रायफल शूटिंग, वर्ड अॅण्ड प्लांट ऑब्झर्वेशन, कराटे, मार्शल आर्ट, ऑबस्टॅकल ट्रेनिंग, नेतृत्वगुण विकास मार्गदर्शन, ग्रुप डिस्कशन, डिबेट शारिरीक कवायत, योगा, प्राणायाम, सांस्कृतिक शेकोटी कार्यक्रम यांचा समावेश आहे.
आंबोलीच्या निसर्गरम्य वातावरणात सैनिक स्कूलच्या भव्य प्रांगणात आयोजित या साहस शिबिरामध्ये सहभागी होण्याची सुवर्णसंधी सिंधुदुर्गातील युवक युवतींना उपलब्ध झाली आहे. आतापर्यंत १५० मुलामुलींनी नावनोंदणी केलेली आहे. तरी या शिबीराचा जास्तीत जास्त जणांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष पी. एफ. डॉन्टस यांनी केले आहे.
अधिक माहितीकरीता ९४२०१९५५१८ व ७८२२९४२०८१ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे