भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेलींकडून ग्रामपंचायत प्रशासनाचे कौतुक
पालकमंत्र्यांच्या हस्ते लवकरच ॲपचे होणार उद्घाटन
सावंतवाडी
कोळगाव ग्रामपंचायत चे काम जिल्ह्यालाच नव्हे तर राज्यालाही आदर्शवत असे आहे. कोलगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून “ई-कोलगाव” हे अॅप सुरू करण्यात आले आहे. या अॅपच्या माध्यमातून गावातील लोकांना घरबसल्या कोणतेही दाखले उपलब्ध होणार आहेत. या अॅपचे उद्घाटन लवकरच पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे,अशी माहिती जिल्हा बँकेचे संचालक महेश सारंग यांनी दिली.दरम्यान, हे अॅप काढण्याचा निर्णय घेणार्या ग्रामपंचायत प्रशासनाचा जिल्हा भाजपाच्या माध्यमातून भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.राज्यातील व जिल्ह्यातील कोलगाव ही असे ॲप काढणारी पहिली ग्रामपंचायत आहे. या अॅपच्या माध्यमातून कोणत्याही ग्रामस्थाला आपले दाखले थेट ऑनलाईन पध्दतीने काढण्यात येणार आहेत. त्यासाठी त्याला ग्रामपंचायतीमध्ये जाण्याची गरज नाही. तसेच सरपंच किंवा ग्रामसेवक नसेल तरीही त्याचे काम होणार आहे. या ठिकाणी अॅपवर मागणी केल्यानंतर संबधित उमेदवाराला थेट डिजिटल सिग्नेचर असलेला दाखला मिळणार आहे. या उपक्रमाचे उद्घाटन लवकरच पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याहस्ते करण्यात येणार आहे.
दरम्यान, यावेळी अशाप्रकारे लोकाभिमुख वे अॅप तयार करणार्या कोलगांव ग्रामपंचायत प्रशासनाचे राजन तेली यांनी कौतुक केले. तसेच अशा प्रकारचा वेगळा उपक्रम राबविल्याने त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी अनिल नाईक, चंदन धुरी, हेमांगी मेस्त्री, रसिका करमळकर, प्रभाकर राऊळ, सुलभा मेस्त्री, अब्दुल साठी, प्रणाली टिळवे, रोहीत नाईक आदी ग्रामस्थ उपस्थित होते.