You are currently viewing सर्वसामान्यांचे नेतृत्व ….

सर्वसामान्यांचे नेतृत्व ….

अनंत पिळणकर वाढदिवस अभिष्टचिंतन

वैभववाडी तालुक्यातील कुर्ली गावचे श्री अनंत पिळणकर हे सर्वसामान्यांचे नेतृत्व म्हणून जिल्हाभरात ओळखले जातात. मायानगरी मुंबई येथे नोकरीनिमित्त असलेले अनंत पिळणकर यांना मुंबईपेक्षा गावची ओढ अधिक होती, म्हणून गाव विकासाने झपाटलेले अनंत पिळणकर यांनी २००८ साली मुंबई सोडून गावचा रस्ता धरला. कुर्ली वसाहत ही धरणग्रस्त भाग. या धरणग्रस्तांचे प्रश्न सरकार दरबारी मांडत कुर्ली गाव व नवीन कुर्ली वसाहत येथील विविध प्रश्न हाती घेत देवधर धरणामुळे विस्थापित झालेल्या गावाचे फोंडाघाट जवळील माळरानावर पुनर्वसन करण्यात आले. मात्र शासन नियमानुसार देण्यात येणाऱ्या मूलभूत सुविधा या पुनर्वसित गावठाणात अजूनही मिळालेल्या नाहीत. अंतर्गत रस्ते, प्रकल्पग्रस्तांचे मोबदले, गावठाणासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत अनेक प्रश्न आजही शासन दरबारी प्रलंबित असून त्या प्रश्नांसाठी अनंत पिळणकर हे गेली बारा ते पंधरा वर्षे सातत्याने झटत आहेत.

गाव विकासासाठी सामाजिक कार्य करत असताना केवळ सामाजिक कार्यकर्ता म्हणून कुठल्याही विकासात्मक कामासाठी लढा देत असताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. अशावेळी एखाद्या राजकीय पक्षाचे पाठबळ मिळाले तर विकासाला गती मिळते, विकासासाठी झटणाऱ्याला बळ मिळते. या सर्वांचा विचार करून अनंत पिळणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि पक्षाच्या माध्यमातून त्यांनी कुर्ली गावातील तसेच पुनर्वसन गावठाणातील अनेक प्रश्न मार्गी लावले. नवीन कुर्ली वसाहत विकास समितीच्या माध्यमातून ते शासन दरबारी नेहमीच अनेक समस्यांचा पाठपुरावा करत असतात आणि समस्या सोडविण्यासाठी सातत्याने झटत असतात. शासनाच्या पुनर्वसन नियमानुसार प्रकल्पग्रस्तांच्या गावठाणाला स्वतंत्र ग्रामपंचायत देणे बंधनकारक आहे. मात्र कुर्ली वसाहत निर्माण होऊन अनेक वर्षे लोटली तरी नवीन कुर्ली वसाहतीला स्वतंत्र ग्रामपंचायत मिळालेली नाही. महाविकास आघाडी सरकारच्या काळात ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून नवीन कुर्ली ग्रामपंचायत निर्मिती अंतिम टप्प्यात आली होती. मात्र काही अल्पसंतुष्ट प्रकल्पग्रस्तांना हाताशी धरून काहींनी यात खो घातला. तरीही अनंत पिळणकर यांनी हार मानलेली नसून काहीही झाले तरी नवीन कुर्ली ग्रामपंचायत मिळविणारच असा त्यांनी “पण” केला आहे.

अनंत पिळणकर यांनी राजकारणात प्रवेश केल्यापासून राजकारण व समाजकारण करत असताना विरोध हा त्यांच्या पाचवीलाच पुजलेला आहे. निस्वार्थी राजकारण व समाजकारण करत असून देखील प्रत्येक वेळी त्यांना विरोधाचा सामना करावा लागतो. अनंत पिळणकर यांच्या धडाडीच्या कार्यपद्धतीमुळे तथाकथित अनेक लोकप्रतिनिधी व गाव पुढार्‍यांना राजकीय दुकानदारी करताना अडचणी निर्माण होतात. त्यामुळे खोट्या गुन्ह्यात अनंत पिळणकर यांना अडकविण्याचे प्रयत्न अनेकदा झाले आहेत. नवीन कुर्ली वसाहतीतील मंजूर जलजीवन योजनेचे काम लगतच्या लोरे गावातील काही लोकप्रतिनिधींनी चुकीच्या पद्धतीने राबविण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र अनंत पिळणकर यांनी जागरूक राहत तो हाणून पाडला. कुर्ली गाव वसाहत व गावचा सर्वांगीण विकास आज आपला ध्यास असल्याचे अनंत पिळणकर हे आवर्जून सांगतात. अशा या धडाडीच्या सर्वसामान्य लोकांच्या आणि धडाडीच्या नेतृत्वाला संवाद मीडियाकडून वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा आणि भविष्यातील वाटचालीसाठी सदिच्छा.

प्रतिक्रिया व्यक्त करा