You are currently viewing स्पर्धेत स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा हवी – प्रा.रुपेश पाटील यांचे प्रतिपादन

स्पर्धेत स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा हवी – प्रा.रुपेश पाटील यांचे प्रतिपादन

बॅ. नाथ पै महाविद्यालयात व्याख्यान संपन्न*

कुडाळ

विद्यार्थी जीवनात नेहमीच मनात प्रश्न निर्माण झाले पाहिजेत, त्यासाठी आपण प्रतिभावंत व्यक्तींची पुस्तके वाचली पाहिजेत. ग्रंथालयाची कास धरली पाहिजे. ग्रंथ आपल्याला सशक्त बनवतात, आपण जसा विचार करतो, तसेच आपण पुढे घडतो म्हणून सकारात्मक विचार ठेवा, मोबाईलच्या मोहात पडू नका, आज चांगला माणूस बनणं काळाची गरज आहे, स्पर्धेत स्वतःला सिद्ध करायचे असेल तर जीव तोडून मेहनत करा, प्रयत्नांची पराकाष्ठा करा, असे मौलिक प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा.रुपेश पाटील यांनी कुडाळ येथे केले.
कुडाळ येथील बॅरिस्टर नाथ पै करिअर अकॅडेमी, बॅरिस्टर नाथ पै जुनिअर कॉलेज कुडाळ यांच्या वतीने तसेच संस्था अध्यक्ष उमेश गाळवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या करिअर मार्गदर्शन शिबिरात प्रा. रुपेश पाटील बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर बॅरिस्टर नाथ पै
कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचे प्राचार्य डॉ. सुरज शुक्ला, बॅरिस्टर नाथ पै ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य तथा बॅरिस्टर नाथ पै करिअर अकॅडेमीचे हेड अर्जुन सातोस्कर, डॉ. दीक्षा पवार, ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य मंदार जोशी आदि मान्यवर तसेच विद्यार्थ्यांचे पालक मोठया संख्येने उपस्थित होते.

यावेळी प्रा. रुपेश पाटील पुढे म्हणाले, विजेते तेच होतात जे झपाटलेल्या व्यक्तीसारखे काम करतात. यशाला कोणत्याही प्रकारचा शॉर्टकट नाही. विद्यार्थ्यांना यशस्वी व्हायचे असेल तर अतोनात मेहनत करणे व प्रामाणिकपणे अभ्यास करणे गरजेचे आहे. दैनंदिन वर्तमानपत्रातून स्वतःच्या वैयक्तिक टिपणे काढण्याची सवय विद्यार्थ्यांनी अंगीकारायला हवी. दिनविशेष, दैनंदिन विशेष घडामोडी आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यक्तींची कामगिरी यांची विद्यार्थ्यांनी दररोज नोंद करायला हवी. स्पर्धा परीक्षेसाठी हे अत्यंत उपयुक्त आहे.
असे सांगून प्रा. पाटील यांनी विविध स्पर्धा परीक्षांची सखोल माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांमध्ये विचारल्या जाणाऱ्या अवघड प्रश्नांची अचूक उत्तरे सोप्या पद्धतीने कशा प्रकारे सोडविता येतात, हे स्वतः प्रात्यक्षिक करून दाखविले.

यावेळी उपस्थित असलेले डॉ. सुरज शुक्ला यांनी आपल्या मनोगतात वैद्यकीय क्षेत्रातील करिअर किती महत्त्वाचे आहे, याची माहिती दिली. तसेच अलीकडे फिजिओथेरपी क्षेत्र कशा पद्धतीने वाढत आहे, याचेही महत्त्व सांगितले.

डॉ. दीक्षा पवार यांनी आपल्या वैद्यकीय क्षेत्रातला अनुभव विद्यार्थ्यांसमोर कथन करून नीट व जेईई यांसारख्या परीक्षाना कशा पद्धतीने सामोरे गेले पाहिजे, याचे मार्गदर्शन केले.

प्राचार्य अर्जुन सातोस्कर यांनीही विद्यार्थ्यांना आपल्या अकॅडेमीच्या माध्यमातून कशा पद्धतीने मार्गदर्शन केले जाते, हे सांगून कुडाळ व तालुक्यातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बॅरिस्टर नाथ पै अकॅडेमी व विद्यालय सातत्याने प्रयत्नशील असल्याचे नमूद केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. मंदार जोशी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. रोहिणी नाईक, प्रा. पूजा मेस्त्री व सर्व प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा