*रोहिणी गंगावणे महिला मंडळाचे आयोजन*
*प्रसिद्ध कवयित्री वृंदा कांबळी करणार सादरीकरण*
कुडाळ :
सन २०२२ ला कवयित्री श्रीमती शांता शेळके यांची जन्मशताब्दी साजरी झाली. श्रीमती शांता शेळके यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून पिंगळी येथील श्री भद्रकाली मंदिरात ०४ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ४.०० वाजता पिंगळी गुढीपूर येथील रोहिणी गंगावणे महिलामंडळ आयोजित कवयित्री शांता शेळके यांच्या कवितांवर आधारित “कळी, कळी वेचताना” हा सदाबहार असा काव्यवाचनाचा कार्यक्रम सादर होणार आहे.
कुडाळ येथील प्रसिद्ध लेखिका कवयित्री वृंदा कांबळी या कवयित्री श्रीमती शांता शेळके यांच्या स्त्री जीवन विषयक जाणिवांच्या कवितांचे सादरीकरण करणार आहेत. कविता सादरीकरण म्हणजे केवळ वाचन करणे नसून कवितांच्या आशयानुसार सूत्रसंचालन व अभिनयातून कवितांचे सादरीकरण असे कार्यक्रमाचे स्वरूप असल्याने कवितांच्या कार्यक्रमास ‘चार चांद” लागतील हे मात्र खरे.
प्रसिद्ध कवयित्री श्रीमती शांता शेळके यांनी अनेक विषयांवर काव्यलेखन केले असून सामाजिक, स्त्रियांविषयी देखील विपुल लेखन केले आहे….
तसे तर शब्द जिवाभावाचे सखेसोबती
श्वासोच्छ्वासाइतके मला निकटचे क्षणोक्षणी
शब्दांच्या आधारानेच सोसत आले आजवर
प्रत्येक आनंद, आघात, आयुष्यातली अधिक उणी….
असे शब्दांविषयी बोलतानाच…
“काटा रुते कुणाला” या कवितेतून चिर, दाह, वेदनेचा आपल्याला शाप असल्याचे सांगत आतील जीवाची कळ कुणाला कशी सांगू..? अशा अंतरितील वेदना व्यक्त करत आहेत.
काटा रुते कुणाला, आक्रंदतात कोणी
मज फूल ही रुतावे हा दैवयोग आहे
सांगू कशी कुणाला कळ आतल्या जीवाची
चिर-दाह वेदनेचा मज शाप हाच आहे…
अशा सुरेल कवितांचा आस्वाद घेण्यासाठी रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहा असे आाहनही रोहिणी गंगावणे महिला मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.