सिंधुदुर्गनगरी
कोविड – 19 च्या काळात मास्क आणि सॅनिटायझरच्या मागणीमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने मास्क आणि सॅनिटायझरच्या किंमती निश्चित केल्या आहेत. त्यानुसार मास्कच्या दर्जानुसार राज्यातील त्यांच्या विक्रीचे जास्तीत जास्त मुल्य निश्चित करण्यात आले आहे. सदर मुल्य पुढील प्रमाणे असणार आहे.
व्ही आकारातील एन 95 मास्कची करांसह जास्ती जास्त किंमतही 19 रुपये असणार आहे. तर विविध प्रकारच्या एन 95 मास्कच्या किमती या 25 रुपये ते 49 रुपये दरम्यान असणार आहे. तर एफएफपी 2 मास्क हे 12 रुपये, टू प्लाय सर्जिकल विथ लुप किंवा टाय 3 रुपये व डॉक्टर्स कीट हे 127 रुपये या प्रमाणे दर निश्चित करण्यात आले आहेत.
सदरची किंमत मर्यादा ही साथरोग नियंत्रण कायदा अंमलात असेपर्यंत लागू असणार आहेत. या किंमती या राज्यातील सर्व मास्क उत्पादक, वितरक, किरकोळ विक्रेते यांना लागू राहील. राज्यातील सर्व मास्क उत्पादक कंपन्या, वितरक, किरकोळ विक्रेते यांनी मास्कचा दर्जा व निश्चित करण्यात आलेली कमाल विक्री किंमत दर्शनी भागावर लावणे आवश्यक आहे. राज्यातील मास्कची गरज लक्षात घेता उत्पादकाने राज्यात उत्पादित केलेला व राज्यात आवश्यक असलेला माल विहित दराने उपलब्ध करून देणे आवश्यक राहील. रुग्ण सेवा देणाऱ्या राज्यातील शासकीय व खाजगी रुग्णालये, नर्सिंग होम, कोवीड केअर सेंटर, डेडीकेटेड कोवीड हॉस्पिटल्स यांना मास्कचा पुरवठा करताना निश्चित करण्यात आलेल्या दराच्या मर्यादेच्या 70 टक्के दराने उपलब्ध करुन देणे आवश्यक राहील. तसेच खाजगी रुग्णालयांनी निश्चित केलेल्या दराने मास्कची खरेदी केल्यानंतर खरेदी किमतीच्या 110 टक्के पेक्षा जास्त रक्कम रुग्णांकडून आकराता येणार नाही. या प्रकरणी काही तक्रार असल्यास जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी हे तक्रार निवारणासाठी सक्षम प्राधिकारी असल्याचे वि.ब.तासखेडकर, सहाय्यक आयुक्त (औषधे) अन्न व औषध प्रशासन, सिंधुदुर्ग हे कळवितात.