You are currently viewing बांदा-सटमटवाडी येथील तपासणी नाका तात्काळ बंद करा…

बांदा-सटमटवाडी येथील तपासणी नाका तात्काळ बंद करा…

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे यांना निवेदन सादर

बांदा

भारतातील सर्व सीमाशुल्क तपासणी नाके बंद करण्याचे धोरण केंद्र शासन राबवत असून बांदा सटमटवाडी येथे उभारण्यात आलेल्या सीमा तपासणी नाक्यावर खासगी कंपनीमार्फत होणाऱ्या शुल्क वसुलीला सिंधुदुर्ग जिल्हा मोटार मालक चालक वाहतूक संघटनेचा विरोध असून हा तपासणी नाका तात्काळ बंद करावा, अशी लेखी मागणी संघटनेच्या वतीने आज नवीन तपासणी नाक्यावर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे यांच्याकडे करण्यात आली.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष गिरीधर रावराणे, संचालक शिवाजी घोगळे, खजिनदार राजन बोभाटे, संचालक रामदास पडते, उपाध्यक्ष अशोक कंदळगावकर, बांदा डंपर संघटनेचे अध्यक्ष शामसुंदर धुरी, उपाध्यक्ष प्रशांत पांगम आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, राज्य शासनाच्या आदेशानुसार तपासणी नाका आजपासून सुरु करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली. या नाक्यावर गौण खनिज वाहतूक करताना तसेच मालवाहतूकदार वाहनाकडून वाजनानुसार सेवा प्रक्रिया शुल्क, त्यावरील सेवाकर व उपकर वसुली करण्यात येणार आहे. ही नियमावली जाचक व वाहनधारकांवर आर्थिक भुर्दंडची आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वजन काटा नसल्याने मालवाहतूकदार किंवा गौण खनिज वाहतूकदार हे ब्रासवर मालाची भरणा करतात. गोव्यात जाताना प्रत्येक खेपेवेळी शुल्क आकरण्यात येणार असल्याने यामुळे सर्वसामान्य वाहतूकदार कोलमडून जाणार आहे. याचा विचार करून हे तपासणी नाके तात्काळ बंद करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा