काजू-बी व बोंडूला भाव मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत…
सावंतवाडी
गोवा राज्यात काजू-बी ला हमीभाव मिळाला आहे. शेतकऱ्यांना प्रतिकिलो १५० रूपये देण्यात आले आहेत. त्याही पेक्षा जास्त काजू बी ला महाराष्ट्र राज्य सरकारने हमीभाव दिला पाहिजे, अशी मागणी सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे यांनी केली आहे.
काजू पीक हे नगदी पीक असून ते हमखास मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा होऊ शकतो, असे गेल्या काही वर्षांपासून सांगितले जात असल्याने शेतकऱ्यांनी जमीन काजू पीक लागवडीखाली आणली. काजूची मशागत आणि संवर्धन केले. मात्र काजू बी ला आणि बोंडूला भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक चिंतेत असतात, ही चिंता दूर करण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा, अशी शेतकऱ्यांच्या वतीने गावडे यांनी मागणी केली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये काजू पिकाचा प्रति किलो दर हा घटत आहे. त्यामध्ये वाढ व्हायला पाहिजे. ती होत नाही. मागील काही वर्षात १८० रुपये प्रति किलोपर्यंत काजू ला भाव मिळत होता. मात्र सध्या १२५ ते १३५ पर्यंतच हा भाव मिळतो आहे. तोही कमी होत आहे. तो किमान १५० ते १८० च्या घरात मिळायला हवा असे शेतकऱ्यांचे मत आहे. राज्य सरकारने काजूला हमीभाव मिळवून देण्यासाठी चालढकल पणा करून चालणार नाही, असे गावडे यांनी सांगितले.
राज्य सरकारने काजू बोर्ड निर्माण करण्याची घोषणा केली असून काजू पॉलिसी देखील राज्य सरकारने ठरविली आहे. अर्थसंकल्पात काजूला प्राधान्य देण्यात आले आहे. आता प्रत्यक्षात शेतकऱ्यांना प्रति किलो काजू दराचा हमीभाव मिळाला. गोवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काजूला हमीभाव दिला आहे. तसा महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्र्यांनी काजूला हमीभाव देण्यासाठी खास प्रयत्न करण्याची गरज आहे, असे प्रमोद गावडे यांनी सांगितले.
यंदाच्या हंगामामध्ये अवकाळी पाऊस, निसर्गाचे बदलते वातावरण आणि अति उष्णता झाल्याने काजू पीक धोक्यात आले आहे. तरीही भर उन्हामध्ये शेतकरी काजू शेतीमध्ये जाऊन उरलासुरला काजू गोळा करत आहेत. नैसर्गिक आपत्ती आली आहे. तरीही काजू शेतीवर अवलंबून असणारे बागायतदार शेतकरी पीक घेण्यासाठी पुढाकार घेत आहेत त्यामुळे त्यांना हमीभाव मिळाला. राज्य सरकारने हमीभाव १५० ते १८० रुपयापर्यंत द्यावा, अशी मागणी देखील प्रमोद गावडे यांनी यावेळी केली आहे.