You are currently viewing महाराष्ट्र गोवा तपासणी नाका उद्यापासून शुभारंभ

महाराष्ट्र गोवा तपासणी नाका उद्यापासून शुभारंभ

बांदा
तब्बल १५ वर्षे वादाच्या भोव-यात सापडलेला बांदा येथील सीमा तपासणी नाका अखेर उद्यापासून सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात आरटीओ व राज्य उत्पादन शुल्क खात्याचे नाके या ठिकाणी सुरू होणार आहेत. त्यानंतर अन्य नाकी सुरू होणार आहेत.
याबाबतचे आदेश आयुक्तांनी काढले आहे.याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे यांनी दुजोरा दिला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाची नुकतीच बैठक घेऊन नाका सुरू करण्यासंदर्भात आदेश देण्यात आले आहेत.
हा अत्याधुनिक सीमा तपासणी नाका असल्याने या नाक्यावर परराज्यातून येणाऱ्या वाहनांना आता तपासणी करूनच राज्यात प्रवेश मिळणार आहे. गेली १५ वर्षे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला हा सीमा तपासणी नाका आता सुरु होणार असल्याने बेकायदा व ओव्हरलोड वाहतुकीला चाप बसणार आहे. गेले अनेक वर्षे विविध कारणांनी हा तपासणी नाका वादात सापडला होता.
सुरुवातीला गणेश चतुर्थी कालावधीत तपासणी नाका सुरु कारण्याच्या हालचाली होत्या. मात्र त्यानंतर दिवाळीचा मुहूर्त ठरविण्यात आला होता. तपासणी नाका सुरु होण्याच्या पार्श्वभूमीवर व कालावधी कमी असल्याने येथील सर्व कामे जलदगतीने पूर्ण करण्यात आली होती. हा अत्याधुनिक तपासणी नाका असल्याने याठिकाणी प्रशासकीय तांत्रिक बाबींबरोबरच प्रवाशांना देखील सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. राज्याच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने राज्यात सीमेवर ठिकठिकाणी अत्याधुनिक २२ तपासणी नाके उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यामध्ये बांदा-सटमटवाडी येथील तपासणी नाक्याचा देखील समावेश आहे. मंजुरी मिळाल्यानंतर २००७ मध्ये प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात आली. मात्र तपासणी नाक्यासाठी ३२ एकर क्षेत्र संपादित करण्यात आल्याने स्थानिक भूमिपुत्रांनी प्रचंड विरोध करत प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. शासनाने बळाचा वापर करत पोलीस बंदोबस्तात भुसंपादन व सीमांकन प्रक्रिया पूर्ण केली होती. नाक्याच्या विरोधात हरित लवाद व सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल असल्याने तपासणी नाक्याचे काम गेली अनेक वर्षे रखडले होते. न्यायालयीन मार्ग मोकळा झाल्याने हा तपासणी सुरु करण्याबाबत राज्य शासनाकडून हालचाली सुरु करण्यात आल्या. ठेकेदार कंपनीला लवकरात लवकर नाका सुरु करण्यासाठी काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र मागील वर्षात ३ वेळा मुहूर्त साधूनही तपासणी नाका सुरु न झाल्याने नाका सुरु होण्याबाबत साशंकता होती.
या नाक्यावर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ), पोलीस, वनविभाग, उत्पादन शुल्क, महसूल, दहशतवाद विरोधी पथक तसेच अमली पदार्थ विरोधी पथक अशा सात विभागाचे कर्मचारी २४ तास सेवा बजाविणार आहेत. हा अत्याधुनिक तपासणी नाका असून या नाक्यावरून प्रवास करणारे कोणतेही वाहन हे डिजिटल स्कॅनिंग होऊन बाहेर पडणार आहे. यामुळे दारू वाहतूक, अमली पदार्थ वाहतूक याची तात्काळ माहिती मिळण्यास मदत होणार आहे.
महामार्गाच्या दुतर्फा दोन्ही मार्गांवर नाका उभारण्यात आला आहे. अधिकारी व कर्मचारी यांच्या निवासासाठी संकुल उभारण्यात आले आहे. नाक्याच्या परिसरातील सर्व इमारतीची साफसफाई व रंगरंगोटीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. याठिकाणी सात विभागाचे कार्यालय होणार असल्याने प्रत्येक इमारतीला खत्यानुसार नावे देखील देण्यात आली आहेत.
महामार्गावार इन्सुली खामदेव नाका तर गोव्यातून प्रवेश करताना पत्रादेवी येथून पुढे तपासणी नाका असल्याने वाहने सावकाश चालवा अशा आशयाचे फलक तसेच वेगमर्यादा व दिशादर्शक फलक देखील हे ६ महिन्यांपूर्वीच लावण्यात आले आहेत.

प्रवाशांसाठी या ठिकाणी विश्रांती कक्ष, प्रतीक्षालय, कँटीन, पिण्याचे पाणी, प्रसाधनगृह, एटीएम, स्नानगृह, प्रथमोपचार केंद्र, दिव्यांग प्रवाशांसाठी बेड व व्हील चेअर, वैद्यकीय अधिकारी, अत्यवस्थ रुग्णासाठी रुग्णवाहीका आदी सुविधा देखील टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात येणार येणार आहेत. सुरुवातीला अत्यावश्यक सुविधा सुरु करण्यात आल्या आहेत.
या नाक्यावर वाहनांचे पूर्ण स्कॅनिंग होणार आहे. यासाठी याठिकाणी अत्याधुनिक यंत्रणा बसविण्यात आली आहे. नाक्याचा परिसर मोठा असल्याने येथे २४ तास सिसिटीव्हीची नजर असणार आहे. हा तपासणी नाका असल्याने याठिकाणी वाहनाकडून कोणताही टोल आकरण्यात येणार नाही. मात्र व्यावसायिक व माल वाहक वाहनांकडून मालाच्या वजनानुसार टोल आकारण्यात येणार आहे. हलकी व्यावसायिक वाहने ज्यांचे वजन साडेसात मेट्रिक टन असेल त्यांच्याकडून ४७ रुपये २० पैसे, मध्यम व्यावसायिक वाहने ज्यांचे वजन साडेबारा मेट्रिक टन असेल त्यांच्याकडून ९४ रुपये ४० पैसे, जड व अतिजड व्यावसायिक वाहने ज्यांचे वजन १२ मेट्रिक टन च्या पुढे असेल त्यांच्याकडून १८८ रुपये ८० पैसे टोल आकारण्यात येणार आहे. यासाठी नाक्याच्या दोन मार्गीकांवर वजन काटे लावण्यात आले आहेत. यातून कृषी मालाची वाहतूक करणाऱ्या तसेच शासनाच्या संरक्षण विभागाची वाहने यांना सवलत देण्यात आली आहे. खासगी वाहने सुरक्षेच्या कारणास्तव पूर्णपणे स्कॅन करूनच सोडण्यात येणार आहेत.
१ एप्रिल पासून आरटीओ व उत्पादन शुल्क खात्याची कार्यालये सुरु होणार आहेत. त्याच दिवसापासून याठिकाणी वाहनांची तपासणी सुरु करण्यात येणार आहे. आज श्री काळे यांनी याठिकाणी भेट देत सर्व सुविधांची पाहणी केली. तसेच बैठक देखील घेतली. यावेळी मोटार वाहन निरीक्षक सचिन पोलादे, निरीक्षक श्री अल्लमवार व कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा