आत्मा संघटनेचे अध्यक्ष प्रेमानंद देसाई यांची मागणी; अन्यथा शेतकऱ्यांना एकत्र करत गोव्यात काजू बी विक्रीचा प्रयत्न
दोडामार्ग
तालुक्यात काजू उत्पादनाखाली क्षेत्र अधिक आहे. येथील काजू बी दर हे गोवा बागायतदाराच्या धर्तीवर असल्याचे यापूर्वी कारखानदारांनी सांगितले आहे. नुकताच गोव्याचा अर्थसंकल्प जाहीर झाला असून काजूला १२५ वरून १५० रुपये हमीभाव जाहीर झाला. त्यामुळे आता याच हमीभावाने दोडामार्ग तालुक्यातील काजू बी खरेदी करावी. शिवाय कारखानदारांना जे सहकार्य हवे असेल ते आत्मा संघटना देईल असे दोडामार्ग तालुका आत्मा संघटनेचे अध्यक्ष प्रेमानंद देसाई यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
श्री देसाई पुढे म्हणाले, दोडामार्ग तालुक्यात भातशेतीखालील क्षेत्र कमी झाले. काजू उत्पादनाला चांगला भाव मिळत असल्याने काजू लागवड वाढली. काजू उत्पादनावर अनेकांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह असतो. सुरुवातीला १८० रुपये प्रती किलोचाही दर मिळाला त्यामुळे या उत्पन्नाकडे शाश्वत स्त्रोत म्हणून शेतकरी पाहू लागले. मात्र आता १२१ रुपये पर्यंत दर घसरला. त्यामुळे शेतकऱ्यांचा मशागत खर्च आणि उत्पन्न यांचा ताळमेळ बसत नाही. गोवा सरकारने हे लक्षात घेऊन काजूला १५० रुपये हमीभाव जाहीर केला. त्याचा फायदा दोडामार्ग तालुक्यातील शेतकऱ्यांना झाला पाहिजे. कारण दोडामार्गातील काजू बी दर हे गोव्याच्या धरतीवर असतात. हे करत असताना कारखानदारांना तांत्रिक अडचणी आल्यास आत्मा संघटनेशी त्यांनी संपर्क करावा त्यांना सहकार्य मिळेल असे देसाई म्हणाले. शिवाय जर कारखानदारांनी अपेक्षित दर दिला नाही तर शेतकऱ्यांना संघटित करून काजू बी गोव्यात विक्री कसा करता येईल याचे नियोजन पुढील काळात केले जाईल असा इशाराही श्री. देसाई यांनी दिला आहे.