*विश्व हिंदू परिषद वेंगुर्ला प्रखंडात राम नवमीचा ज्ञान जागर*
वेंगुर्ला
हिंदू जनमानसात प्रभू श्रीरामा विषयी असलेली आस्था सर्वश्रुत आहे. सारा देश राम नवमीला राम नाम रूपी अमृताचा आस्वाद घेत असतो. भजन पूजन कीर्तनातून राम नामाचा जागर अखंड हिंदुस्तानात होत असतो. विश्व हिंदू परिषदेच्या वेंगुर्ला प्रखंडाच्या वतीने ‘मंत्री’राम मंदिरात श्रीराम जन्मोत्सवाच्या निमित्ताने श्री मारुती स्तोत्र व श्री राम रक्षा स्तोत्र पाठांतर स्पर्धा दोन गटात आयोजित करण्यात आल्या. तालुकास्तरीय अशा या स्पर्धेत सुमारे ४५ शालेय विद्यार्थ्यांनी भाग घेतला इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या गटातील विद्यार्थ्यांना श्री मारुती स्तोत्राचे पठण करावयाचे होते. या स्पर्धेचे परीक्षण निवृत्त शिक्षक अजित राऊळ व रत्नप्रभा प्रभू साळगावकर यांनी केले. या स्पर्धेत प्रसन्ना नारायण बर्वे या विद्यार्थ्याने प्रथम, कृपा निलेश बांदवलकर हिने द्वितीय, तर शर्व बाबुराव आपटे याने तृतीय क्रमांक प्राप्त केला. अंकुर वामन गावडे व प्रणव गजानन केसरकर यांना उत्तेजनार्थ पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. श्री राम रक्षा पठण स्पर्धेत प्रथम क्रमांक साईराज विनय सामंत याने पटकावला तर द्वितीय क्रमांक साठी प्रथा राघवेंद्र जोशी हिची निवड करण्यात आली. या स्पर्धेत छोट्या गटातील प्रसन्ना नारायण बर्वे याने श्री राम रक्षा स्तोत्राचे सफाईदार सादरीकरण करून परीक्षकांची व श्रोत्यांची शाबासकी मिळविली .या स्पर्धेचे परीक्षण ॲड . सुषमा प्रभू खानोलकर व अजित राऊळ सर यांनी केले. प्रथम क्रमांकाला रुपये ४०० रोख, प्रशस्तीपत्र, द्वितीय क्रमांकाला रुपये ३०० रोख व प्रशस्तीपत्र तृतीय क्रमांकाला रुपये २०० रोख व प्रशस्तीपत्र तसेच दोन उत्तेजनार्थ क्रमांकांना रुपये १०० रोख आणि प्रशस्तीपत्राने गौरविण्यात आले. विश्व हिंदू परिषद वेंगुर्ला प्रखंडाच्या वतीने आयोजित ही स्पर्धा हायटेक कॉम्प्युटर्सचे संचालक गणेश अंधारी यांच्यातर्फे प्रायोजित केली होती . शिवाय सर्वच सहभागी स्पर्धांना प्रशस्तीपत्रक पेन स्केच पेन अशा भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले . विश्व हिंदू परिषदेच्या ४८ साधिकांनी सामुदायिक रित्या श्री रामरक्षा स्तोत्र, श्री मारुती स्तोत्र सुस्वराने सादर करून उपस्थितांसमोर एक आदर्श प्रस्थापित केला. कार्यक्रमासाठी सर्व सोयींनी युक्त स्थळ उपलब्ध करून देण्याचे महत्त्वाचे काम मंत्री दांपत्याने केले. शिवाय प्रत्येक उपस्थिताला अल्पोपाहाराने तृप्त केले. बक्षिस वितरण समारंभास रामेश्वर मंदिर देवस्थानचे बुजुर्ग मानकरी रवींद्र जी परब , भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटनीस प्रसन्ना उर्फ बाळू देसाई , तालुक्याध्यक्ष सुहास गवंडळकर, वेंगुर्ला प्रखंडाचे अध्यक्ष अरुण गोगटे , मंत्री आप्पा धोंड , रा.स्व.संघाचे बाबुराव खवणेकर सर व मंदार बागलकर आदी मान्यवरांनी मोलाचे मार्गदर्शन करून कार्यक्रम यशस्वी होण्यास मदत केली.