कुडाळ :
आज ३० मार्च रोजी पिंगुळी येथील साई मंदिराचे नजीक भंगसाल नदी पात्राला लागून वन्यप्राणी मगर बाहेर आल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थ धीरेंद्र चव्हाण यांनी दिली असता वनविभाग कुडाळ च्या रेस्क्यू पथकाने तात्काळ घटनास्थळी दाखल होत स्थानिक ग्रामस्थांचे मदतीने तिला यशस्वी रेस्क्यू केले.
मादी जातीच्या ६ ते ७ वर्षे वयाच्या मगरीचे पशु वैद्यकीय अधिकारी यांचे कडून वैद्यकीय तपासणी करुन तिला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी कुडाळ श्री अमृत शिंदे यांनी दिली.
वन्यजीव अधिनियम १९७२ च्या अनुसूची १ मध्ये वर्गीकृत करणेत आलेल्या वन्यप्राणी मगर ही जलीय परिसंस्थेच्या सर्वोच्च स्थानी असून स्वछता दूत म्हणून तीचे अस्तित्व महत्त्वाचे असलेचे सांगून वन्यप्राणी मगर चा वावर असलेल्या भागातील नागरिकांनी पाण्याकडे पाळीव जनावरे घेऊन जाताना काळजी घेण्याचे तसेच नागरी वस्तीकडे वन्यप्राणी दिसून आल्यास तात्काळ वनविभागाला माहिती देणेचे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले.
सदर बचाव मोहीम उपवनसंरक्षक सावंतवाडी श्री. नवकिशोर रेड्डी यांचे मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी कुडाळ श्री अमृत शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी कडावल अमित कटके, श्री धुळू कोळेकर वनपाल नेरूर त हवेली, श्री विष्णू नरळे वनरक्षक नेरूर त हवेली स्थानिक ग्रामस्थ संजय ठाकूर, गोट्या चव्हाण, अक्षय सावंत, बंटी ठाकूर, अमित सावंत,केदार भोसले,छोटू सावंत, निखिल सावंत, सचिन सावंत, ओमकार पालकर आदींनी यशस्वी केली.