जिल्हावासियांना शुध्द व सुरक्षित पाणी पुरवठा करणे ही जिल्हा परिषदेची जबाबदारी
– मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर
सिंधुदुर्गनगरी
पाणी म्हणजे जीवन आहे, म्हणुनच मानवी जीवनात स्वच्छ व शुध्द पाण्याचे अनन्य साधारण महत्व आहे. शुध्द व सुरक्षित पाणी पुरवठा होण्यासाठी पाणी गुणवत्ता चांगली असणे गरजेचे आहे. जिल्हावासियांना शुध्द पाणी पुरवठा करणे ही जिल्हा परिषदेची जबाबदारी असुन त्या करीता जिल्हापरिषद कटिबध्द आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी केले आहे.
शरद कृषी भवन येथे जल जीवन मिशन अंतर्गत ग्राम पाणी पुरवठा स्वच्छता समिती सदस्य तसेच ग्रामपंचायत स्तरावरील भागधारक यांच्या स्तर- 3 चे दोन दिवसीय अनिवासी प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकुर, श्रीपाद पाताडे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक संतोष पाटील, आदी उपस्थीत होते. यावेळी जल जीवन मिशन अंतर्गत पाण्याची गुणवत्ता राखण्याकरीत तयार करण्यात आलेली पाणी गुणवत्ता माहिती पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले.
प्रास्ताविकांत श्री. ठाकुर म्हणाले, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी जल जीवन मिशन अंतर्गत कोट्यावाधी रुपयांच्या नळपाणी योजना प्रस्तावित करण्यात आलेल्या आहेत. मात्र पाण्याची गुणवत्ता वाढविणे हे गावकऱ्यांच्या हाती आहे. ग्रामपंचायत स्तरावरील सरपंच, ग्रामीण पाणी पुरवठा समिती, पाणी गुणवत्ता विषय काम करणाऱ्या महिला, जल सुरक्षक यांना मार्गदर्शन व्हावे, या हेतुने ही पुस्तिका तयार करण्यात आली आहे. पाणी नमुना कसा घ्यावा, त्याची तपासणी कशी करावी, तपासणी केलेले नमूने ऑनलाईन कसे करावे, जल सुरक्षक यांची कर्तव्य आदींची माहिती या पाणी गुणवत्ता पुस्तिकेच्या माध्यमातुन देण्यात आली आहे. ही पुस्तिका ग्रामपंचायतस्तरावर पाणी गुणवत्तेबाबत मार्गदर्शक ठरेल. कार्यक्रमांचे सुत्रसंचालन निलेश मठकर यांनी केले.