You are currently viewing दगडी कुंपण तोडून डंपर घुसला घराच्या अंगणात

दगडी कुंपण तोडून डंपर घुसला घराच्या अंगणात

मालवण

मालवण- आचरा मार्गावरून मालवणच्या दिशेने भरधाव वेगाने जाणारा डंपर कोळंब येथील राजन आंगणे यांच्या घरासमोरील दगडी कुंपण तोडून थेट अंगणात घुसल्याची घटना आज रात्री घडली. मोठा आवाज होऊन घडलेल्या या अपघाताची तीव्रता पाहून सारेच हवालदिल झाले. सुदैवाने आंगणे यांच्या अंगणात कोणीही व्यक्ती नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या प्रकाराने संतप्त बनलेल्या कोळंब ग्रामस्थानी यापुढे या मार्गांवरून डंपर वाहतूक होता नये, असा इशारा घटनास्थळी दाखल झालेल्या पोलीस प्रशासनाला दिला.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार एमएच ०७ सी ६१३१ या क्रमांकाचा रिकामी डंपर आज रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास कोळंब येथील राजन शंकर आंगणे यांच्या घरासमोरील दगडी कुंपणाला धडकून अपघात घडला. या घटनेने ग्रामस्थानी त्याठिकाणी धाव घेतली. सदर डम्पर चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे ग्रामस्थामध्ये बोलले जात होते. ज्या दगडी कुंपणावर डंपर आदळला त्यावर नेहमी लहान मुले खेळत असतात. मात्र आज सुदैवाने मुले त्याठिकाणी नव्हती. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. तसेच कुंपण नसते तर डंपर थेट घरात घुसून जीवितहानी झाली असती, अशी भीती यावेळी व्यक्त करण्यात आली.

दरम्यान, यावेळी पोलीस निरीक्षक विजय यादव व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र या घटनेची माहिती पोलिसांना देऊनही उशिरा घटनास्थळी दाखल झाल्याबद्दल ग्रामस्थानी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच डंपर चालकावर कारवाई व्हावी, या मार्गांवरून यापुढे धोकादायक अशी डंपर वाहतूक होता नये, त्यास पोलिसांनी पायबंद घालावा, अशी मागणी ग्रामस्थानी केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा