सावंतवाडी
सांगेली दळयाचे टेंब येथील अग्नी प्रलयात शेतमांगर भस्मसात झाल्याने सुमारे अडीज लाख रूपयांचे नुकसान झाले. या आगीच्या ज्ज्वाळा पाहून धनगरवाडीतील ग्रामस्थांनी धाव घेतली. मात्र तोपर्यंत भर दुपारची वेळ तसेच वाऱ्यामुळे हा शेत मांगर जळून खाक झाला होता. परंतु ही आग परीसरात पसरु यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करीत उर्वरीत शेती बागायती या आगीपासून वाचाविली.
सांगेली येथील महादेव शंकर पारधी यांची दळयाचे टेंब – कुंभायची शेळ येथे शेती बागायती असुन त्यात शेत मांगर आहे. सकाळी ते साडे अकराच्या सुमारास या शेती बागायतीत काम करून घरी गेले. त्यानंतर दुपारच्या सुमारास ही घटना घडली. त्यानंतर सर्वप्रथम धनगरवाडीतील ग्रामस्थ धाऊन आले. पाठोपाठ गोविंद आंगचेकर, सुनिल राऊळ, सखाराम राऊळ, प्रणय सांगेलकर, ओंकार गोठोसकर आदीं ग्रामस्थांनी धाव घेतली.
प्रथम या शेत मांगराच्या लगत असलेल्या लाकडाच्या ब्रासला आग लागली. त्यानंतर या आगीच्या ज्ज्वाळानी या शेत मांगराच्या छप्पराने पेट घेतला. यात छप्पर जळून खाक होत जमिनदोस्त झाले. तर छप्परावरील मंगलोरी कौलांचा चक्काचूर झाला. शेत मांगरातील शेती औजारेही या आगीच्या भक्षस्थानी पडली. तसेच गवताची गंजीही राख झाली. या घटनेत सुमारे अडीज लाख रूपयांचे नुकसान झाल्याने महादेव पारधी यांना धक्काच बसला आहे.दरम्यान सांगेली सरपंच लवु भिंगारे, ग्रामपंचायत सदस्य सागर सांगेलकर, गुरुनाथ राऊळ, आनंद राऊळ, बाळा राऊळ आदींनी या नुकसानीची पाहणी केली.