You are currently viewing तोंडवळी येथील तरुणाची आत्महत्या

तोंडवळी येथील तरुणाची आत्महत्या

मालवण :

 

ओझर मार्गावर एका झाडास तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी दिसून आली. निलेश गोविंद तोंडवळकर वय-४२ रा. तोंडवळी वरची असे तरुणाचे नाव आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. मालवण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आकस्मिक मृत्यू नोंद करत पुढील तपास सुरू आहे.तोंडवळी सरपंच नेहा तोंडवळकर यांचे निलेश हे पती होत. निलेश यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, आई, भाऊ व अन्य परिवार आहे. निलेश यांच्या आकस्मिक मृत्यू नंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी- सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ओझर रस्त्यालगत असणाऱ्या आंब्याच्या झाडाला एक तरुण गळफास लावलेल्या स्थितीत स्थानिकांना तसेच अन्य दुचाकीस्वारांना दिसला. हा मृतदेह निलेश तोंडवळकर यांचा असल्याचे समजताच त्यांचे नातेवाईक गणेश तोंडवळकर ग्रामस्थांसह घटनास्थळी दाखल झाले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार पोलीस निरीक्षक विजय यादव, पोलीस उपनिरीक्षक नितीन नरळे, हेमंत पेडणेकर, सुभाष शिवगण, सुशांत पवार आदी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा केला.

निलेश तोंडवळकर हे आज सकाळी सकाळी ९.३० वाजता ते स्थानिकांना ओझर येथून दुचाकीवरून जाताना दिसले. ओझर हायस्कूलच्या प्रवेशद्वाराच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर त्यांनी आपली दुचाकी लावलेली दिसून आली. १० वाजण्याच्या सुमारास ओझर रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीस्वारांना, स्थानिक ग्रामस्थांना आंब्याच्या झाडास त्यांचा मृतदेह गळफास लावलेल्या स्थितीत दिसून आला. याप्रकरणी येथील पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा