बांदा :
गोगटे-वाळके महाविद्यालयाचे प्रा. रमाकांत सीताराम गावडे यांना राष्ट्रीय शैक्षणिक सेवा गौरव पुरस्कार जाहीर झाला असून रविवार दिनांक २६ रोजी हरमल-गोवा येथे केंद्रीय कायदा मंत्री विरप्पा मोईली यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे.
प्रा. गावडे हे गेली २७ वर्षे महाविद्यालयात ज्ञानदानाचे कार्य करत आहेत शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी सावंतवाडी तालुक्यात अनेक समाजपयोगी उपक्रम राबविले आहेत. ग्रामीण भागातील मुलींना हक्काचे शिक्षण मिळावे यासाठी प्राथमिक शाळेतील तब्बल १०० विद्यार्थिनीचे त्यांनी दत्तक घेत त्यांचे पालकत्व स्वीकारले आहे. महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांना देखील त्यांनी शिष्यवृत्ती मिळवून दिली आहे. शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील योगदानबाबत इंटिग्रेटेड सोशल वेल्फेअर सोसायटी बेळगाव व नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन बेळगाव या संस्थेने त्यांची पुरस्कारासाठी निवड केली आहे.
या पुरस्कार सोहळ्यात दिल्ली, गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा राज्यातील निवडक पुरस्कार प्राप्त व्यक्तींना गौरविण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनुर, कोल्हापूरचे महापौर राजू शिंगाडे, बेळगावचे खासदार अमरसिंग पाटील, अरविंद घट्टी, गुजरातच्या कोमल शर्मा, दिल्लीचे विशेष अभियंता जयराज लोंढे, बिदरचे जिल्हा पोलीस अधीक्षक महेश मेघन्नावर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. प्रा. गावडे यांच्या उत्तुंग सामाजिक कामगिरीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.