आनंदाचा शिधा, एक टन ची तफावत…
सावंतवाडीतील माजी नगरसेवकांनी केला पर्दाफाश
सावंतवाडी
शासनाकडून सावंतवाडी तालुक्यासाठी पाठविण्यात आलेल्या आनंदाच्या शिध्यातील साखरेत एक-दोन नव्हे, तर तब्बल एक टनाचा घोळ झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. त्यामुळे हे ट्रक पुन्हा माघारी पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणाचा येथील माजी नगरसेवकांच्या गटाने “पर्दाफाश” करत सर्व प्रकार उघडकीस आणला आहे. दरम्यान या प्रकाराची सखोल चौकशी करण्यात यावी व संबंधितावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. यासंदर्भात आज माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांच्यासह उमाकांत वारंग व विलास जाधव यांनी तहसीलदार अरुण उंडे यांची भेट घेतली. व हा प्रकार त्यांच्या नजरेस आणून दिला आहे.
२१ मार्चला सकाळी ८:०० वाजता आनंद शिद्यातील २५ टन साखरेची पॅकेट असलेला ट्रक सावंतवाडी गोदामात दाखल झाला. यावेळी त्याची मोजणी केली असता प्रत्येक पॅकेटमध्ये किलोमागे २०० ते ३०० ग्रॅमची तूट मिळाली. त्यामुळे तेथील पुरवठा व्यवस्थापकांनी तो ट्रक साखर न स्वीकारता माघारी पाठवला. दरम्यान या ठिकाणी आलेला ट्रक एकाएकी माघारी का गेला ? अशी शहरात चर्चा रंगली. यावेळी त्याचा माजी नगरसेवकांकडून पाठपुरावा करण्यात आला. तसेच यासंदर्भात छुप्या पद्धतीने माहिती घेण्यात आली. यावेळी २५ टन मागे किमान एक टन तरी घोटाळा असल्याचे उघड झाले आहे. त्यानुसार संबंधितावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी जिल्हा पुरवठा विभागाकडे केली आहे. तर या संदर्भात तहसीलदारांची भेट घेऊन सुद्धा त्यांचे लक्ष वेधण्यात आले असून त्यांच्याकडून सुद्धा योग्य ती पावले उचलली जावीत, आणि धान्य पुरवठा विभागात अन्य मार्गानेही असा घोटाळा होतो का ? याची तपासणी करावी, अशी मागणी त्यांनी केली.