You are currently viewing सिंधुदुर्ग पोलीस मुख्यालयात सायबर पोलीस ठाण्याचे उद्धाटन

सिंधुदुर्ग पोलीस मुख्यालयात सायबर पोलीस ठाण्याचे उद्धाटन

सिंधुदुर्गनगरी :

कोकण परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रविण पवार यांच्या हस्ते येथील पोलीस मुख्यालयात आज सायबर पोलीस ठाण्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी श्री. पवार यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांची चौकशी करुन त्यांचे कौतुक तर केलेच शिवाय त्यांच्या कामगिरी बद्दल समाधान व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या.

यावेळी पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले, पोलीस निरीक्षक अमित यादव, सायबर पोलीस ठाण्याचे स.पो.नि.बळीराम सुतार यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.सुरुवातीला विशेष पोलीस महानिरीक्षक प्रविण पवार यांच्या हस्ते कोनाशिला अनावरण करण्यात आले. त्यानंतर फित कापून पोलीस ठाण्याचे उद्घाटन झाले. पोलीस अधीक्षक श्री. अग्रवाल यांनी यावेळी माहिती दिली.

विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. पवार यांनी सायबर पोलीस ठाण्याची पहाणी करत उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी केली. यावेळी येथील धनश्री परब या बी.ए.,डी.एड., एल.एल.बी. तर स्वप्नील तोरसकर हा डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक, एल.एल.बी. झाल्याचे सांगितले. यावेळी श्री. पवार म्हणाले, सायबर पोलीस ठाण्याला या दोघांच्या ज्ञानाचा पोलीस दलास निश्चित फायदा होईल. पोलीस दलात अनेक उच्च शिक्षण घेतलेले कर्मचारी आहेत. विशेषत: घर सांभाळून महिला कर्मचारी आपले शिक्षण घेतात. अशा पोलीस दलाचा निश्चितच अभिमान आहे. याचा फायदा गुन्ह्याची उकल करताना होणार आहे. अशा शब्दात कौतुक करुन शुभेच्छा व्यक्त केल्या.

सायबर पोलीस ठाण्याचे स.पो.नि. बळीराम सुतार यांनी सायबर पोलीस ठाणे निर्माण करण्याचा हेतू विषद करुन जिल्ह्यातील सायबर गुन्हांच्या तपासाचा आढावा सादर केला.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा