घरबांधणी परवानगीचे अधिकार पुन्हा एकदा ग्रामपंचायतीकडे देण्यात आल्याची घोषणा अब्दुल सत्तार यांनी केली
सिंधुदुर्ग
तत्कालीन फडणवीस सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारने केराची टोपली दाखवली आहे. आता घरबांधणी परवानगीचे अधिकारही पुन्हा ग्रामपंचायतीकडे देण्यात आले आहेत. शिवसेना नेते आणि महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सिंधुदुर्गात यासंबंधी घोषणा केली.
फडणवीस सरकारने घर बांधणीच्या परवानगीचे अधिकार ग्रामपंचायतीकडून काढून घेऊन टाऊन प्लानिंगकडे (जिल्हा स्तरावर) दिले होते. त्यामुळे ग्रामीण भागात बांधकाम परवानगीसाठी नागरिकांना अडचणी येत होत्या. लोकप्रतिनिधींनीही या निर्णयाला विरोध केला होता.
महाविकास आघाडी सरकारने याची दखल घेऊन फडणवीस सरकारचा हा निर्णय रद्द केला. आता घर बांधणी परवानगीचे अधिकार पुन्हा एकदा ग्रामपंचायतीकडे देण्यात आल्याची घोषणा अब्दुल सत्तार यांनी सिंधुदुर्गात केली.
दरम्यान, परराज्यातील घुसखोरी करणाऱ्या मच्छिमारी बोटींवर आता कडक कारवाई करण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या हद्दीत घुसणाऱ्या बोटींवर दंडात्मक कारवाईसाठी वेगळा कायदा केला जाणार आहे. त्यासाठी मत्स्यविभागाचे मंत्री अस्लम शेख यांची येत्या 15 दिवसात बैठक होणार असून त्यांनंतर या संदर्भातील निर्णय घेतले जाणार आहेत, अशी माहिती अब्दुल सत्तार यांनी दिली.