You are currently viewing सावंतवाडीत काँग्रेसकडून केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन…

सावंतवाडीत काँग्रेसकडून केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन…

सावंतवाडी

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने मानहानी प्रकरणात दोशी ठरविल्यानंतर भाजप आमदारांकडून विधान भवना समोर छेडण्यात आलेल्या आंदोलनाचा सावंतवाडीत काँग्रेसकडून निषेध करण्यात आला. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान गांधी यांच्या प्रतिमेवर जोडे मारणाऱ्या आमदारांचा उपस्थित पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी तीव्र शब्दात निषेध केला. तर हा सर्व प्रकार म्हणजे काँग्रेसचा आवाज दाबण्यासाठी केंद्र सरकारचे रचलेले एक षडयंत्र आहे. मात्र त्यांचा प्रयत्न आम्ही कधीही यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा यावेळी ज्येष्ठ नेते ॲड. दिलीप नार्वेकर यांनी दिला. तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी रवींद्र म्हापसेकर, संजय लाड, आनंद परुळेकर, अशोक राऊळ, सुधीर मल्हार, तौकीर शेख, चंद्रकांत राणे, संतोष सावंत, समिर भाट, अमिदी मेस्त्री, विभावरी सुकी, स्मिता वागळे, उल्का सांगेलकर, माया चिटणीस, तौकीर शेख, आनंद कुंभार, राज पेडणेकर आदींसह मोठ्या संख्येने काँग्रेसचे पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.

या प्रसंगी श्री. नार्वेकर पुढे म्हणाले, विरोधी नेत्याची भूमिका बजावत असताना राहुल गांधी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडत आहेत. मात्र त्यांचा आवाज दाबण्यासाठी भाजपाने आता प्रयत्न सुरू केले आहेत. सवयीप्रमाणे आपल्या विरोधात कोणी बोलू लागला की त्याला एक तर इडी लावायची नाहीतर कुठच्या तरी खोट्या गुन्ह्याखाली न्यायालयात पाठवायचे हा त्यांचा आता दिनक्रमच ठरला आहे. मात्र जर असे प्रकार करून कोणी काँग्रेसचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तर आम्ही खपून घेणार नाही. वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून जनतेला तुमचा खोटा चेहरा दाखवून देऊ, असा इशारा त्यांनी दिला.

याप्रसंगी सौ. सुकी म्हणाल्या, विधान भवन समोर भाजपाच्या नेत्यांनी राहुल गांधी यांच्या प्रतिमेवर जोडे मारून केलेले आंदोलन निंदनीय आहे. भाजपाची कोणीही सत्य बाजू दाखवली की त्याच्या विरोधात जाण्यासाठी त्यांना इडी नाहीतर न्यायालयाचा आधार घ्यावा लागतो, हे जनतेला सुद्धा कळले आहे. त्यामुळे येत्या काळात जनताच तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल, मात्र आमच्या नेत्यावर जर खोटे आरोप किंवा गुन्हे दाखल करून काँग्रेस संपवण्याचा प्रयत्न झाल्यास आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा