राजकीय विशेष
सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद बऱ्यापैकी होती. सावंतवाडी आणि देवगड मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद तुलनेने जास्त होती. कणकवलीत देखील संदेश पारकर यांच्यामुळे वरचष्मा होता. दीपक केसरकर राष्ट्रवादीचे सावंतवाडी मतदारसंघात आमदार असताना नारायण राणे आणि केसरकर यांच्यात संघर्षाचं वातावरण निर्माण झाले. त्यातूनच केसरकर यांनी सरळ सरळ नारायण राणे यांच्यावर तोफ डागण्यास सुरुवात केली. नारायण राणे यांची दादागिरी, दडपशाही, आणि दहशतवाद जनतेसमोर मांडून केसरकर यांनी नारायण राणे यांना राजकारणात बॅकफूटवर घेऊन गेले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात केसरकर विरुद्ध नारायण राणे यांच्यातील उभा संघर्ष अनुभवायला यायला लागला. नारायण राणे यांनी आपल्या राजकीय अनुभवाचा आणि जेष्ठतेचा फायदा घेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांकडून केसरकर यांच्यावर दबाव आणायला सुरुवात केली. शरद पवारांनी सांगितल्यावर केसरकर यांनी नारायण राणे यांच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला होता. परंतु केसरकर यांच्या म्हणण्यानुसार नारायण राणे यांच्या वागण्यात कोणतीही सुधारणा न झाल्याने संघर्ष शिगेला पोचला. आव्हाने-प्रति आव्हाने दिली गेली. नारायण राणे यांचे आव्हान स्विकारुन केसरकर यांनी मैदानात उतरत आपली धूर्त राजकीय खेळी साकारत नारायण राणे यांना सर्वच आघाड्यांवर चारिमुंडया चित केले.
राष्ट्रवादीचे आमदार असताना शरद पवारांनी आदेश देऊनही नारायण राणे यांच्याशी संघर्ष कायम ठेवल्याने आणि काँग्रेस राष्ट्रवादी युती असूनही केसरकर यांनी नारायण राणे काँग्रेसचे राज्यपातळीवरील नेतृत्व असूनही त्यांना झुगारून लावल्याने शरद पवार नाराज झाले. शरद पवार सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले असताना देखील सावंतवाडीचे राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकर यांनाच भेट दिली नाही, त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करण्यात आले. दुसऱ्या पक्षातील नेत्याच्या चुकीच्या गोष्टींना विरोध करणाऱ्या आपल्याच पक्षाच्या आमदारांचे मनोधैर्य वाढविण्यापेक्षा भेट न देता, कोणतीही चर्चा न करता त्यांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न शरद पावरांकडून झाल्याने दीपक केसरकर व्यथित झाले. सावंतवाडी मतदारसंघावर आपली पूर्ण पकड असताना, जिल्ह्यातील अनेक पंचायत समिती, जि. प. सदस्य आपण निवडून आणले असतानाही, पक्षाला जिल्ह्यात चांगले दिवस आणले असताना आपल्याच नेत्यांकडून मानहानीकारक वागणूक मिळाल्याने अतिशय दुःखी झालेल्या केसरकरांनी आपल्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन राष्ट्रवादी पक्षाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला. जिल्हा राष्ट्रवादीचे ८०% पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यांच्या सोबत राहिले.
दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या स्थापनेपासून राष्ट्रवादीचे काम केले होते. शरद पवार यांचेही त्यांच्यावर प्रेम होते. परंतु राष्ट्रवादीची सूत्रे अजित पवारांनी सांभाळल्यानंतर मात्र केसरकर आणी अजित पवार यांच्यात दुरावा आला. त्याचेच पर्यवसान म्हणून केसरकर शरद पवारांपासून दूर होऊन शिवसेनावासी झाले. परंतु आजही शरद पवारांवर आपले प्रेम कायम असल्याचे ते बऱ्याचदा बोलून जातात….