१० लाखांचा ठोठावला दंड
मालवण
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सागरी हद्दीत मासेमारी करताना पकडुन आलेल्या दोन परप्रांतीय हायस्पीड नौका तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील एका मिनी पर्ससीन नौकेवर सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त सिंधुदुर्ग यांनी दंडात्मक कारवाई केली आहे. तीन ही नौकाना मिळून सुमारे १० लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
मालवण तालुक्यातील तळाशील किनारपट्टीवर निधी दर्शन ही कर्नाटक राज्यातील हायस्पीड नौका देवगड परवाना अधिकारी यांच्या गस्ती नोकेला दिसून आली. नौका ताब्यात घेऊन देवगड बंदरात अवरुद्ध करून ठेवण्यात आली होती. त्यावर ६० हजारांची मासळी सापडून आली होती. मासळी रक्कमेच्या पाच पट दंडा नुसार तीन लाख रुपये, यासह परप्रांतीय नौका व नौकेवर प्रमाणित आकारा पेक्षा कमी आसाचे जाळे यानुसार अन्य दंड असा एकत्रित ६ लाख ८८५ रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.
विजयदुर्ग किनारपट्टीवर निशीराज ही परप्रांतीय मासेमारी नौका ही देवगड परवाना अधिकारी यांच्या गस्ती नौकेला सापडून आली होती. या नौकेवर सुमारे १८ हजारांची मासळी सापडून आली होती. ही नौकाही देवगड बंदरात अवरूद्ध होती. या नौकेला मासळी रक्कमेच्या पाच पट दंड आणि परप्रांतीय नौका असा एकूण २ लाख ९ हजार ३३० असा दंड ठोठावण्यात आला आहे.
विजयदुर्ग सागरी हद्दीत झुलेका जिकरा ही मिनी पर्ससीन नौकाही देवगड परवाना अधिकारी यांना गस्ती दरम्यान सापडून आली होती. या नौकेला १ लाख रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली.
सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त सिंधुदुर्ग श्रीधर अलगिरी यांनी मालवण येथील कार्यालयात गुरुवारी सुनावणी अंती ही दंडात्मक कारवाई केली आहे.
दंडात्मक कारवाईची माहिती मिळताच पारंपारिक मच्छिमार नेते बाबी जोगी यांनी मत्स्य अधिकारी यांची भेट घेऊन कारवाई बाबत समाधान व्यक्त केले. तसेच अनधिकृत एल ई डी लाईट मासेमारीवर कारवाईची मागणी केली.