नवीन वर्षाचे औचित्य साधून पर्यटक विसावा केंद्राचे उद्धाटन…
देवगड
महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या वतीने किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीच्या उपक्रमाला नेहमीच सहकार्य मिळेल. विजयदुर्ग पर्यटनाच्या दृष्टीने सर्वदूर पसरवून येथील स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट या समितीने ठेवले आहे ही कौतुकास्पद गोष्ट आहे. यासाठी मेरीटाईम बोर्ड सहकार्य करणार असल्याचे सुतोवाच सिंधुदुर्गचे प्रादेशिक बंदर अधिकारी संदीप भुजबळ यांनी विजयदुर्ग येथे केले. विजयदुर्ग किल्ले प्रेरणोत्सव समितीच्या वतीने काल मराठी नवीन वर्षाचे औचित्य साधून पर्यटक विसावा केंद्राचे उद्धाटन संदीप भुजबळ यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
हे पर्यटक विसावा केंद्र प्रेरणोत्सव समितीच्या वतीने किल्ल्याच्या पायथ्याशी चालू करण्यात आले आहे. यावेळी विजयदुर्ग मेरीटाईम बोर्डाचे बंदर अधिकारी रजनीकांत पाटील, विजयदुर्ग पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक भारत फारणे, देवगड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अयोध्याप्रसाद गांवकर, विजयदुर्ग ग्रामपंचायतीचे प्रभारी सरपंच रियाज काझी, विजयदुर्ग किल्ले प्रेरणोत्सव समितीचे अध्यक्ष प्रसाद देवधर, सचिव बाळा कदम आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.