You are currently viewing वाढती महागाई व गॅस दरवाढी विरोधात कुडाळात ठाकरे गटाचे पदाधिकारी रस्त्यावर !

वाढती महागाई व गॅस दरवाढी विरोधात कुडाळात ठाकरे गटाचे पदाधिकारी रस्त्यावर !

कुडाळ

वाढती महागाई व गॅस दरवाढी विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मंगळवारी कुडाळ येथे रस्त्यावर उतरले. जोरदार घोषणाबाजीने हल्लाबोल करीत केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध केला. शिवसेना शाखा येथून डोक्यावरून गॅस सिलिंडर, लाकडे, तवा, भाकरीचे पीठ जिजामाता चौकापर्यंत रॅलीने नेत तेथे चुलीवर भाकरी बनवून आगळेवेगळे आंदोलन केले. गॅस दरवाढी विरोधात कुडाळ तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षचे पदाधिकारी कार्यकर्ते आज सकाळी येथील शिवसेना कार्यालय येथे एकवटले. जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार विरोधात आंदोलन छेडण्यात आले. डोक्यावर सिलिंडर या कार्यालयाकडून जिजामाता चौक येथे रस्त्यावर दगड रचून चूल तयार करण्यात आली आणि त्यावर लाकडाच्या सहाय्याने भाकरी बनवून आंदोलन करण्यात आले.दस्तुरखुद्द कुडाळ तालुका प्रमुख राजन नाईक यांनी स्वतः सिलिंडर गॅस डोक्यावर घेत घोषणाबाजी करीत सर्वांचे लक्ष वेधले. केंद्र तसेच राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत एकच हल्लाबोल करण्यात आला. महागाई वाढविणा-या केंद्र व राज्य सरकारचा निषेध असो, केंद्र सरकार हाय हाय, राज्य सरकार हाय हाय, या सरकारचे करायचे काय ? खाली डोके वर पाय, गॅस दरवाढ कमी करा, नाहीतर खुर्ची खाली करा, पन्नास खोके – एकदम ओके अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट, महिला आघाडी विधानसभा संघटक श्रेया परब, तालुका महिला संघटक मथुरा राऊळ, स्नेहा दळवी, कुडाळ तालुका संजय गांधी निराधार योजना समिती माजी अध्यक्ष अतुल बंगे, कुडाळ शहर प्रमुख संतोष शिरसाट, उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी नगरसेवक उदय मांजरेकर, नगरसेविका सई काळप, श्रेया गवंडे व ज्योती जळवी, माजी उपसभापती श्रेया परब , ओबीसी सेल जिल्हाप्रमुख रूपेश पावसकर, जि.प.माजी सदस्य राजू कविटकर , शहरप्रमुख राजू गवंडे, युवासेना शहरप्रमुख संदीप म्हाडेश्वर, विभागप्रमुख गंगाराम सडवेलकर, दिपक आंगणे, नरेंद्र राणे, बाळू पालव,सतीश कुडाळकर, गुरू गडकर आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.केंद्र सरकारने उज्ज्वला गॅस योजना राबवून सर्वसामान्यांना सबसिडी देण्याचे आमिष दाखवले. मात्र सबसिडी न देता जनतेची फसवणूक केल्याचा आरोप जिल्हाप्रमुख श्री.पडते व श्रेया परब यांनी केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा