इचलकरंजी : प्रतिनिधी
इचलकरंजी महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने मराठी माध्यम शाळा बालवाडी व पहिलीच्या वर्गातील मुलांच्या मोफत शैक्षणिक प्रवेशासाठी उद्या बुधवार दि.२२ मार्च रोजी गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर नांव नोंदणी शुभारंभ करण्यात येणार आहे.
इचलकरंजी महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या मराठी माध्यम शाळांनी विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याबरोबरच विविध स्पर्धा परीक्षा, क्रीडा स्पर्धा व त्यांच्यातील अंगभूत कला -गुण अधिक विकसित होण्याच्या दृष्टीने जाणीवपूर्वक विविध माध्यमातून प्रयत्न सुरु ठेवले आहेत. त्यामुळे या शाळा आता सुसंस्कारित विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवणारे विद्या मंदिर म्हणून खरी ओळख निर्माण करुन पालकांबरोबरच विद्यार्थ्यांचा मोठा विश्वास संपादन करण्यात कमालीच्या यशस्वी ठरल्या आहेत.
विशेष म्हणजे शिक्षकांचे विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष व मार्गदर्शन, अभ्यासाची उजळणी, विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण व ई – लर्निंग सुविधा, वह्या – पुस्तके, गणवेश व अन्य शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतात. त्यामुळे कोणत्याही वर्गातील विद्यार्थी मुलभूत शिक्षणाच्या हक्कापासून वंचित रहात नाही. या सर्व वैशिष्ट्यांमुळेच आता महापालिका शिक्षण विभागाच्या मराठी माध्यम शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दाखल करण्यात पालकांचा कल वाढला आहे.हे सकारात्मक चिञ मराठी माध्यम शाळांमधील शिक्षणाची वाढलेली गुणवत्ता व दर्जा सिद्ध करणारी आहे.
याचेच आदर्श उदाहरण म्हणून रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतन क्रमांक २७ या शाळेकडे पाहिले जाते.या शाळेतील अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेबरोबरच क्रीडा क्षेत्रात चांगली कामगिरी करत महापालिकेच्या मराठी माध्यम शाळा आता खासगी शाळांच्या एक पाऊल पुढे असल्याचे दाखवून दिले आहे.ही उज्वल यशाची परंपरा कायम रहावी ,मुले सुसंस्कारित घडावीत, पालकांचा आणि एकूणच समाजाचा सरकारी मराठी माध्यम शाळांकडे बघण्याचा दृष्टीकोन सुधारावा ,याच उदात्त हेतूने बालवाडी, पहिलीच्या वर्गातील पुढील वर्षाच्या मोफत शैक्षणिक प्रवेशासाठी सर्व स्तरातील मुलांनी मराठी माध्यम शाळांमध्ये प्रवेश घ्यावा, यासाठी शिक्षकांनी घरोघरी जाऊन पालकांना शिक्षणाचे महत्व पटवून देत त्यांच्यामध्ये चांगल्या पध्दतीने जनजागृती केली आहे. याला पालकांचा व विद्यार्थ्यांचा देखील मोठा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. याच पार्श्वभूमीवर शहरातील रवींद्रनाथ टागोर विद्या निकेतन क्रमांक २७ व जुना चंदूर रोड परिसरातील हुतात्मा बाबू गेनू विद्या मंदिर क्रमांक २८ यासह विविध ठिकाणच्या सर्व मराठी माध्यम शाळांमध्ये बालवाडी व पहिलीच्या वर्गातील मुलांच्या मोफत शैक्षणिक प्रवेशासाठी उद्या बुधवार दि.२२ मार्च रोजी गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर नांव नोंदणी शुभारंभ करण्यात येणार आहे. तरी इच्छुक पालकांनी आपल्या पाल्यांची मोफत शैक्षणिक प्रवेशासाठी नांव नोंदणी करावी, असे आवाहन इचलकरंजी महापालिका शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.