युवा सेनेच्या वतीने सावंतवाडीत शिक्षणमंत्री दीपक केसरकरांच्या कार्यालयासमोर आंदोलन
सावंतवाडी :
सिंधुदुर्गातील डी.एड धारकांना जिल्ह्यातच नोकऱ्या द्या, या मागणीसाठी युवा सेनेच्या वतीने आज शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले. दरम्यान जोपर्यंत स्थानिकांना न्याय मिळत नाही तोपर्यंत जिल्हा अंतर्गत ४५० शिक्षकांच्या होणाऱ्या बदल्या रोखून धरणार, असा इशारा कुडाळ तालुकाप्रमुख योगेश धुरी यांनी दिला. तर दीपक केसरकर हाय-हाय, आता तुमचं राहील तरी काय…?, गद्दार है गद्दार है केसकर गद्दार है…! नोकरी आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची…! अशा घोषणांनी आंदोलनकर्त्यांनी परिसर दणाणून टाकला. यावेळी जिल्ह्यात ८५० डीएड शिक्षकांच्या जागा रिक्त असून जोपर्यंत या शिक्षकांच्या जागा भरल्या जात नाही. तोपर्यंत ४५० शिक्षकांना जिल्हा बाहेर जाऊ देणार नाही असा इशारा योगेश धुरी यांनी दिला. यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाठ, जिल्हा समन्वयक गुणाजी गावडे, पंकज शिरसाठ, योगेश धुरी, सागर नानोस्कर, मदन राणे, संदीप महाडेश्वर, राजू गावडे, सागर भोगटे, रुपेश खडपकर, मनीष तोटकेकर, गुरू गावकर, सागर जाधव आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.