ओरोस :
किर्लोस कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ आणि कृषि महाविद्यालयाचे प्राध्यापक यांच्या उपस्थितीत समृध्द आणि आनंदी गाव प्रकल्प जिल्ह्यात राबविण्यासाठी चर्चासत्राचे आयोजन प्रकल्पाचे जनक माजी खासदार ब्रिगे सुधीर सावंत यांचे अध्यक्षतेखाली करण्यात आले. या वेळी ब्रिगे. सुधीर सावंत म्हणाले की शेतकऱ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रथम प्राधान्य देण्यात येईल. त्याच बरोबर त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी नैसर्गिक शेतीचा शास्वत उपक्रम गावोगावी राबविण्यात येईल असे म्हणाले. यावेळी जिल्हाधिकारी यांचेशी त्यांनी दूरध्वनी द्वारे थेट संभाषण करून चर्चा केली. समृध्द आणि गाव प्रकल्पामध्ये विविध घटकांचा समावेश आहे. अधिकारी यांचे असे म्हणणे आहे की प्रत्येक घटकांचा वेगवेगळा प्रस्ताव मंजुरी साठी सादर करावा. परंतु तसे न करता सर्व घटकांचे एकात्मिक मॉडेल बनवून ह्या प्रकल्पास आर्थिक तरदूत करावी अशी जिल्हाधिकारी यांचेकडे मागणी केली. कृषि विज्ञान केंद्रा मार्फत समृध्द आणि आनंदी गाव प्रकल्प, मिलेट मिशन, वृक्ष लागवड अभियान, पशुसंवर्धन व दुग्ध विकास प्रकल्पांचे आराखडे सिंधुरत्न समृद्धी योजनेमध्ये सादर करण्याचे ब्रिगे. सुधीर सावंत यांनी सूचित केले. वृक्ष लागवड अभियान द्वारे ओरोस हे गाव ग्रीन सिटी बनविण्यासाठी प्रयत्न करणार, रासायनिक खते व कीटकनाशके हद्दपार करण्यासाठी नैसर्गिक खते व नैसर्गिक कीटकनाशके उत्पादनावर भर देणार असून समृध्द आणि आनंदी गाव प्रकल्पामध्ये सुदृढ आरोग्यास प्रथम प्राधान्य देण्यात येईल असे म्हणाले. या उपक्रमात जिल्ह्यातील जनतेने उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.