विना नंबर प्लेट कार आणि विनापरवाना ४० हजार रुपयांची गोवा बनावटीची दारू जप्त
वेंगुर्ले :
वेंगुर्ले पोलीस पथकाने शनिवारी मध्यरात्री कलानगर येथे टाकलेल्या छाप्यामध्ये बिना नंबर प्लेटच्या कार मधून वाहतूक होत असलेली विनापरवाना तब्बल ४० हजार रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू कार सह ताब्यात घेतली. तसेच कारचालक यालाही ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.
वेंगुर्ले तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीची दारू वाहतूक होत आहे. याबाबत माहिती मिळताच वेंगुर्ले चे पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल वेंगुर्लेकर, पोलीस कॉन्स्टेबल परशुराम सावंत, पोलीस कॉन्स्टेबल पांडुरंग खडपकर, पोलीस कॉन्स्टेबल अमर कांडर यांनी शनिवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास कलानगर वेंगुर्ला येथे छापा टाकला. यामध्ये संशयित सुधीन श्रीराम आगरवाडेकर वय १९ रा. तळवडे मळईवाडी, ता.सावंतवाडी हा आपल्या ताब्यातील सुमारे १ लाख रुपये किमतीची बिना नंबरची पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कारमध्ये ४०,००० रुपये किमतीची गोवा बनावटी दारूची गैरकायदा बिगर परवाना वाहतूक करताना आढळून आला. त्यामुळे त्याच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधि.कलम ६५ (अ) ( ई ) ८१, मोटार वाहन अधिनियम कलम ३(१), १८१,१३०(१), १७७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस वेंगुर्लेकर हे करत आहेत.